दोन वर्षांच्या खंडानंतर संगमनेरात निघणार श्रीराम जन्मोत्सवाची शोभायात्रा! विश्व हिंदू परिषदेकडून आयोजन; बाल श्रीरामच्या पंचायतीचा देखावा ठरणार आकर्षण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाने अपवाद वगळता कोविडच्या अनुषंगाने लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर राज्यात विविध धार्मिक व सार्वजनिक उत्सवांचे आयोजन होवू लागले आहे. संगमनेरातही येत्या रामनवमीच्या दिनी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघणार्या या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांसह बालवेशातील श्रीरामांच्या पंचायतीचा देखावा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यासोबतच गायींचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीही केली जाणार आहे. या शोभायात्रेत श्रीरामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मार्गावर सडा-समार्जन करुन पुष्पवृष्टी करावी असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
![]()
दरवर्षी संगमनेरात श्रीराम व हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. संगमनेरच्या हनुमान विजयरथोत्सवाला तर खूप मोठा आणि अभिमानी इतिहास लाभला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशासह संपूर्ण राज्यात कोविड संक्रमणाने थैमान घातल्याने अशा सर्व सण-उत्सवांवर बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांत देशभरात कोणतेही धार्मिक व अथवा सार्वजनिक कार्यक्रम साजरे झाले नाहीत. मात्र कोविड संक्रमणाच्या या भयानक कालावधीत संगमनेरच्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने मानवी सेवेला प्राधान्य देत महानगरांमधून घराच्या दिशेने पायीच स्थलांतर करणार्या हजारो मजुरांच्या अन्न-पाण्याच्या व्यवस्थेसह तालुक्यातील अनेक निराधार व गरजू नागरिकांच्या मोफत भोजनाची व्यवस्था केली. त्यासोबतच तालुकाभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आपल्यातील सामाजिक कणवेचे दर्शन घडवले.

गेल्या 1 एप्रिल रोजी राज्य सरकारने मुखपट्टी व सामाजिक अंतराचा नियम वगळता कोविडच्या अनुषंगाने घातलेले सर्व निर्बंध मागे घेतले. त्यामुळे गेल्या आठवड्यापासूनच राज्यभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्यातच येत्या रविवारी (ता.10) श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे. संगमनेरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीसह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांकडून दरवर्षी रामनवमीच्या दिवशी विविध कार्यक्रमांसह सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येते. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी हा उत्सव साजरा होणार असल्याने या संघटनांनी त्याची जोरदार तयारीही सुरू केली आहे.

त्यानुसार येत्या रविवारी (ता.10) सायंकाळी पाच वाजता अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेच्या अग्रभागी सनई-चौघडा, हातात भगवेध्वज धारण केलेले घोडस्वार व सांडणीस्वार, आकर्षक रथावर सजवलेली नारायणाची मूर्ती, बालवेशातील श्रीरामांची पंचायत हा देखावा, गोमातेच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणारा देखावा, लेझर लाईटचा वापर करुन साकार होणार्या विविध देवी-देवतांच्या प्रतिमा यासह विविध मर्दानी खेळ, मल्लखांब, भजनी मंडळ आदींचाही या शोभायात्रेत समावेश असणार आहे. अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून सुरू होणारी ही शोभायात्रा नवीन नगररोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चावडी चौक, मेनरोडने सय्यदबाबा चौक, नेहरु चौकातून चंद्रशेखर चौकापर्यंत जाणार आहे. चंद्रशेखर चौकातील पुरातन श्रीराम मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे महाआरती होणार आहे. या शोभायात्रेत संगमनेरातील श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, तसेच शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आपल्या दारापुढे सडा-समार्जन करुन पुष्पवृष्टी करावी असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वाहिनीच्यावतीने करण्यात आले आहे.
