कडक उन्हात विद्यार्थी घेणार सुखद गारव्याचा अनुभव! धुमाळवाडी शाळेला पालकांनी दिले दोन वॉटर कूलर
नायक वृत्तसेवा, घारगाव
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच फॅनचीही हवा गरम लागते म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना गरम होवू नये यासाठी धुमाळवाडी (ता. संगमनेर) ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला दोन वॉटर कूलर नुकतेच भेट दिले आहेत. यामुळे आता कडक उन्हात विद्यार्थी सुखद गारव्याचा अनुभव घेणार आहेत. बहुधा जिल्ह्यात ही पहिलीच शाळा असण्याची शक्यता आहे.
डोळासणे गावांतर्गत असलेल्या धुमाळवाडी येथे पहिले ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. मात्र पत्र्याच्या वर्गखोल्यांमध्ये लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खूप त्रास होतो. त्यातच यंदा अतिशय कडक उन्हाळा असल्याने त्याचा फटका लहान विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या वेळेस पत्रा तापत असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. यावर उपाय म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर फटांगरे व शिक्षिका अनुराधा शिर्के यांनी कडक उन्हाळा सुसह्य होण्यासाठी वर्गामध्ये थंडावा येण्यासाठी ग्रामस्थांपुढे वॉटर कूलरची संकल्पना मांडली. त्यास ग्रामस्थांनी लगेचच होकार दिल्याने लोकसहभागातून दोन मोठी वॉटर कूलर शाळेला भेट देण्यात आले आहेत. यामुळे आता विद्यार्थांना कूलरची थंडा हवा मिळणार आहे.
यापूर्वीही टॅबलेट स्कूल, मूव्हेबल डायनिंग हॉल, आयएसओ मानांकनाचे रिसर्टिफिकेशन यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम धुमाळवाडी शाळेत राबवले आहेत. विविध प्रकारच्या भौतिक सुविधा लोकसहभागातून निर्माण करून एक वेगळा आदर्श धुमाळवाडी ग्रामस्थांनी आखून दिला आहे. यावेळी या वॉटर कूलरचे उद्घाटन शिक्षण विस्ताराधिकारी सुवर्णा फटांगरे, केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे, सरपंच भागीनाथ बांबळे, जयकिसान पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण भागवत, साामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ, नाानाभाऊ बोंबले, कवीता धुमाळ, एकनाथ धुमाळ, नामदेव धुमाळ, रामनाथ धुमाळ, रामनाथ भागवत, आबासाहेब देशमुख, गणेश धुमाळ, नानासाहेब भागवत, घमाजी धुमाळ, भाऊसाहेब भागवत, बांबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण कडू आदी उपस्थित होते.