आदिवासींच्या वनस्पती ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा ः डॉ. माओ कळसूबाई-हरिशचंद्रगड अभयारण्यात वनस्पती शास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषद

नायक वृत्तसेवा, राजूर
आदिवासींना अवगत असलेल्या पारंपारिक वनस्पतींच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व घटकांना व्हावा, असे मत भारतीय वनस्पती शास्त्र सर्वेक्षणालयाचे प्रमुख डॉ. आशिओ माओ (कोलकाता) यांनी व्यक्त केले.

डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी व वनस्पती शास्त्रात सर्वोच्च गणल्या जाणार्‍या इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅन्जिओस्पम टॅक्सॉनॉमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कळसूबाई-हरिशचंद्रगड अभयारण्य (भंडारदरा) येथे आयोजित केलेल्या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

वनस्पती व मानव यांचा घनिष्ट संबध तसेच कोरोनासदृश्य परिस्थितीनंतर मानवाला निसर्गाचे उमगलेले महत्त्व यामुळे वनस्पती शास्त्र विषयाचा अभ्यास ही काळाची गरज मानली जाते. सह्याद्रीच्या रांगेत येणारे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात अनेक नामशेष झालेल्या प्रजातींचे अस्तित्व आढळते. या नामशेष प्रजाती व इथे आढळणार्‍या विविध नाविन्यपूर्ण वनस्पतींची माहिती जगभरातील वनस्पती शास्त्रज्ञांना व्हावी. जैवविविधतेने नटलेला डोंगरदर्‍यांचा परिसर अभ्यासकांना अभ्यासता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील तीस वर्षांत प्रथमच प्रत्यक्ष अभयारण्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यार्‍या जगभरातील 250 वनस्पती शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय वनस्पती शास्त्र सर्वेक्षणालयाचे प्रमुख डॉ. आशिओ माओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, परिषदेचे आयोजक प्रमुख व डॉ. डी. वाय. पाटील आकुर्डी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, आय. ए. ए. टीचे अध्यक्ष डॉ. शशीधरण, उपाध्यक्ष डॉ. एस. आर. यादव, सचिव डॉ. संतोष नॅम्पी, वनविभागीय अधिकारी गणेश रणदिवे, एन.सी.एल.चे शास्त्रज्ञ डॉ. अशोक गिरी, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. प्रभा भोगावकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वनस्पती शास्त्राचे डॉ. मिलिंद सरदेसाई, प्रा. डॉ. महेंद्र ख्याडे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. भागवत ढेसले यांनी केले तर आभार डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले.

Visits: 106 Today: 1 Total: 1102527

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *