… अखेर प्रवरा कालव्यात वाहून गेलेल्या ‘अमन’चा मृतदेह सापडला पोलीस व बचाव पथकाने युद्धपातळीवर राबविली शोधमोहीम
नायक वृत्तसेवा, राहाता
प्रवरा डावा कालव्यामध्ये महाविद्यालयीन तरुण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली आहे. सोमवारी (ता.4) दुपारी साडेचार वाजता वाहून गेल्यानंतर युद्धपातळीवर शोधकार्य सुरू होते. अखेर, मंगळवारी (ता.5) त्याचा मृतदेह नाशिक पुलापासून काही अंतरावर मिळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या उन्हामुळे प्रचंड उकाडा वाढला असून नागरिक दिलासा मिळण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. ग्रामीण भागात तर तरुण वर्ग दुपारच्या सुमारास पाट, चारी, कालवा अशा ठिकाणी पाण्यात पोहायला जातात. मात्र, कधीकधी हे सर्व जीवाशी बेतत असल्याच्या घटना ऐकायला मिळतात. अशीच ही एक धक्कादायक घटना लोणी खुर्दमध्ये घडली आहे.
लोणी खुर्दच्या शांतीनगरमधील अमन रुबाबभाई खाटीक (वय 18) हा सोमवारी दुपारी मित्रांसमवेत कालव्यावर फिरायला गेला होता. कालव्याच्या पाण्यात पोहत असलेल्या मित्राला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हात देत असताना अमनचा पाय घसरून तोल गेल्याने वाहत्या पाण्यात तो पडला. मात्र, अमनला पोहता येत नसल्यामुळे तो कालव्याच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला. मित्रांनी बराच वेळ शोध घेतला मात्र अमन मिळून आला नाही. त्यानंतर नाशिक पूल येथे घटना घडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शिर्डीतून पाचारण केलेल्या बचाव पथकाने अमनला रात्रभर शोधण्याचे प्रयत्न करूनही तो मिळून आला नाही. अखेर मंगळवारी त्याचा मृतदेह नाशिक पूलाजवळच मिळून आला. अमनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली असून खाटीक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.