यंदाच्या दिवाळीला जिल्ह्यात फटाके फोडण्यास मनाई? विभागीय आयुक्तांचे निर्देश; विक्रेत्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविड संक्रमणाची लाट जवळपास ओसरल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महसूल विभाग मात्र त्याला अपवाद ठरला आहे. दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने संक्रमणात पुन्हा वाढ होण्याची भीतीही कायम आहे. त्यातच दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याने त्यातून निर्माण होणार्‍या वायुप्रदुषणामूळे परिस्थिती बिघडण्याचा धोका असल्याचे यंदाची दिवाळी फटाके मुक्त साजरी करावी लागू शकते. त्याबाबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी आपल्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांना तसे निर्देश दिले असल्याची माहिती मिळाली असून त्या विरोधात अहमदनगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील फटाका विक्रेते आक्रमक झाले आहेत.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील कोविड संक्रमणाला ओहोटी लागली आहे. मात्र त्याचवेळी नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यात व त्यातही अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग आजही उंचावलेलाच असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणार्‍या मोठ्या गर्दीमूळे संक्रमणाची तिसरी लाट उसळण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यातच हिंदू धर्मियांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडण्याची पद्धत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होवून संक्रमण वाढण्याचा धोकाही आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी नाशिक महसूल विभागात आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काही निर्देश जारी केले असून यावर्षीची दिवाळी फटाके मुक्त साजरी होईल अशाप्रकारे पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला खुप मोठे महत्त्व आहे. या सणाला गोरगरीबांपासून गर्भश्रीमंतापर्यंत सर्वांनाच उत्साहाचे भरते आलेले असते. दिवाळीच्या निमित्ताने घराची साफसफाई करुन रंगरंगोटी केली जाते, कुटुंबातील अबालवृद्ध दिवाळीच्या दिवशी नवीन पोशाख परिधान करतात. घरातील पूजा-अर्चना झाल्यानंतर सायंकाळपासूनच फटाक्यांची आतिषबाजीही करण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सणाला कोविडचे ग्रहण लागलेले असल्याने गेल्या वर्षीही निर्बंधातच हा सण साजरा करावा लागला होता. मात्र गेल्यावर्षी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आलेली नव्हती. मागील वर्षीच्या तुलनेत सध्या नाशिक विभागाचा व त्यातही अहमदनगर जिल्ह्याचा कोविड आलेख वाढलेलाच असल्याने दिवाळीच्या निमित्ताने त्यात आणखी वाढ होवू नये यासाठी आयुक्तांकडून काही निर्देश देण्यात आले असून त्यात फटाके फोडण्यास मनाई करण्याबाबत सूचित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

याबाबतची माहिती सार्वजनिक होताच अहमदनगरसह संपूर्ण नाशिक महसूल विभागातील फटाके विक्रेते संतप्त झाले आहेत. फटाक्यांची ऑर्डर दिवाळीच्या काही महिने अगोदर द्यावी लागत असते, त्यासाठी आगाऊ रक्कमाही भराव्या लागतात. त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील ठोक व किरकोळ फटाके विक्रेत्यांनी आपापल्या ऑर्डर यापूर्वीच नोंदविलेल्या आहेत. दिवाळीचा सण अवघ्या पंधरवड्यावर आलेला असताना अशा प्रकारच्या बंदी आदेशाने फटाके विक्रेत्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती असल्याचे सांगत नाशिक जिल्ह्यातील फटाके विक्रेते आज सकाळपासूनच आयुक्तालयात ठाण मांडून बसले आहेत. मात्र त्यांना याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यासाठी आयुक्त अथवा वरीष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही फटाक्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. अहमदनगर शहरात आसपासच्या जिल्ह्यांना पुरवठा करणारे असंख्य ठोक विक्रेतेही आहेत. तर संगमनेरात फटाक्यांच्या कारखानदारांसह ठोक व किरकोळ व्यापार्‍यांची संख्याही खूप मोठी आहे. दिवाळीच्या कालावधीत एकट्या संगमनेर तालुक्यात फटाका विक्रीतून सुमारे 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाचा फटाका व्यावसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून आयुक्तांनी आपला आदेश मागे घ्यावा यासाठी नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखानदारांसह ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलनाची तयारी सुरु केली आहे.


एकीकडे संक्रमण वाढीची भीती व्यक्त करुन हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणावर काही प्रमाणात निर्बंध लादण्याची तयारी सुरु असताना गेली दोन दिवस खालावलेली संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आज चौपटगतीने वाढली असून अकोले तालुक्यातील एकासह तालुक्यातील 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालात शहरातील 43 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलाचा समावेश असून ग्रामीण भागातील सायखिंडी येथील 55 वर्षीय इसम, वडगाव येथील 58 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 62 व 55 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 92, 70, 65 व 33 वर्षीय महिलांसह 55 वर्षीय इसम, 13 वे सात वर्षीय मुली, आश्वी खुर्द येथील 89 वर्षीय वयोवृद्ध इसम, बोटा येथील 18 वर्षीय दोन तरुण, ढोलेवाडीतील 40 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगी, घुलेवाडीतील 51 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगी, गुंजाळवाडीतील 11 वर्षीय मुलगी, हिवरगाव पावसा येथील 40 वर्षीय महिला, जांबुत येथील 31 वर्षीय तरुण,

जवळे कडलग येथील 75 वर्षीय महिला, जुनेगाव (तळेगाव दिघे) येथील 24 वर्षीय तरुणासह सहा वर्षीय मुलगा, खंदरमाळ येथील 10 वर्षीय मुलगा, खांडगाव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला, माहुली येथील 40 वर्षीय महिला, मालदाड येथील 75 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, नांदूर येथील 52 वर्षीय इसम, पोखरी बु. येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, रायतेवाडीतील 41 वर्षीय तरुण, समनापूर येथील 27 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 45 वर्षीय महिला, शेडगाव येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सुकेवाडीतील 42 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथील 57 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 33 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 55 वर्षीय महिला, कनोली येथील 30 वर्षीय महिला, अकलापूर येथील 25 वर्षीय तरुण व अकोले तालुक्यातील सुगाव बु. येथील 32 वर्षीय तरुणाचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

विभागीय आयुक्त ‘चारधाम’ यात्रेला!
कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिक महसूल विभागात फटाकेबंदीचे निर्देश देवून हजारो फटाके विक्रेते, कारखानदार व त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या हृदयाची गती वाढवून नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे चारधाम यात्रेला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकीकडे खुद्द आयुक्त देवदर्शनातून आत्मीय समाधान प्राप्त करण्यासाठी तीर्थस्थळी गेलेले असताना दुसरीकडे फटाक्यांच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांची आत्मशांती मात्र भंग झाली आहे. सदरच्या निर्देशाबाबतची माहिती समोर आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक फटाके विक्रेत्यांनी आज सकाळपासूनच विभागीय आयुक्तालयात गर्दी केली आहे. आज रात्री उशीराने आयुक्त डॉ. गमे नाशिकला परतणार असल्याची माहिती मिळत आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1104057

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *