‘दैव बलवत्तर असल्याने आदिवासी कुटुंब बालंबाल बचावले’!
‘दैव बलवत्तर असल्याने आदिवासी कुटुंब बालंबाल बचावले’!
हक्काचा निवारा कोसळला; सतेचीवाडी येथील जाधव कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत
नायक वृत्तसेवा, घारगाव
एकीकडे वरुणराजाच्या रुद्रावताराने शेती उध्वस्त होत असताना हक्काचा निवाराही डोळ्यादेखत पत्यासारखे कोसळत असल्याचे करुण चित्र संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेंडेवाडी गावांतर्गत असलेल्या सतेचीवाडी येथे बुधवारी (ता.23) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पहायला मिळाले. परंतु, आता या गरीब आदिवासी कुटुंबाला समाजातील दानशूरांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. अन्यथा, कोरोनाच्या संकटाने होरपळलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबाला पोटाची खळगी भरणे देखील कठीण होईल.
संगमनेरच्या पठारभागातील शेंडेवाडी गावांतर्गत असलेल्या सतेचीवाडी येथे मातीच्या घराचा निवारा असलेले आदिवासी कुटुंब जाधव हे मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु, यंदा वरुणराजाचा मूड वेगळाच असल्याने तो सतत हजेरी लावत आहे. बुधवारी सायंकाळीही साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने जाधव यांचे मातीचे घर डोळ्यांदेखत पत्यासारखे कोसळले. मात्र, दैव बलवत्तर असल्याने ते बालंबाल बचावले. यावेळी वामन जाधव, गोधाबाई जाधव, बाळू जाधव हे सर्व जण घरात होते. त्यावेळी अचानक आवाज येवू लागल्याने सर्वजण घराबाहेर पळाले. आणि काही क्षणातच संपूर्ण घर कोसळले. घर कोसळल्याचे पाहून वामन जाधव हे पुरते घाबरून गेले. यामध्ये घरातील भांडी, धान्य आदी संसारापपोयी साहित्याचे मोठे नुकसान तर झालेच. परंतु, अख्खी रात्र त्यांनी घराबाहेर जागून काढली. आता त्यांच्यापुढे निवारा कुठे मिळणार असा प्रश्न उभा राहिला असून, मजुरीअभावी पोटाची खळगी भरणेही कठीण झाले आहे.
एरव्ही, दूरवर जाऊन मोलमजुरी करत पोटाची खळगी भरण्यासाठी घाम गाळत आहेत. परंतु, नियतीच्या मनात वेगळे असल्याने आता हक्काचे घरही हिरावून नेले जाधव कुटुंब चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात होरपळलेल्या आदिवासी जाधव कुटुंबियांना निवारा शोधण्यासह अधिक पैशांचा रोजगारही शोधावा लागणार आहे. परंतु, कोरोना संकटात मदतीसाठी सरसावलेल्या सेवाभावी संघटनांनी याची दखल घेत मदत करावी. तसेच समाजातील दानशूरांनीही पुढे येऊन जाधव कुटुंबियांना मदतीचा हात दिल्यास किमान जगण्याची उमेद तरी मिळेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोरोना संकटाने आधी रोजगार हिरावून नेला. आता तर वरुणराजाच्या अवकृपेने हक्काचा निवारा असलेले मातीचे घरही पडल्याने पठारभागातील आदिवासी जाधव कुटुंब उघड्यावर आले आहे. परंतु, त्यांना समाजातील दानशूर, सेवाभावी संस्था आणि मायबाप सरकारने पुढे येत मदत करण्याची गरज आहे. यातून किमान जगण्याची नवी उमेद तरी मिळेल, असा आशावाद परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.