देवळाली प्रवरात अतिक्रमण काढल्याने रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास रस्त्यांच्या अडचणींबाबत नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
नायक वृत्तसेवा, राहुरी
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील खासगी रस्त्यावर गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून रस्त्याच्या कडेच्या दोन्ही मालकांना सामंजस्याने सांगून तोडगा काढून रस्ते विकास अभियानांतर्गत हे रस्ते नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करून दिले आहेत. आता या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून परिसरातील ज्या-ज्या नागरिकांच्या रस्त्याच्या अडचणी असतील, त्यांनी नगरपरिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी केले.
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील वाळुंज वस्ती, पिंपळाचा मळा येथील रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण नगराध्यक्ष कदम यांनी दोन्ही बाजूच्या शेतकर्यांना सामंजस्याने सांगून काढले. आता हा रस्ता पूर्वीप्रमाणे रुंद होणार असून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे, गटनेते सचिन ढूस, अमोल कदम, भीमराज मुसमाडे उपस्थित होते.
नगराध्यक्ष कदम म्हणाले, नागरिकांना शब्द दिल्याप्रमाणे मी या प्रश्नांची गेल्या साडेचार वर्षात सोडवणूक केली आहे. आमच्या हाती सत्ता येताच आम्ही साडेचार वर्षात नगरपरिषद हद्दीतील प्रमुख 80 ते 90 टक्के रस्त्यांची डांबरीकरणाची कामे केली आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने व जलसंधारणाची कामे झाल्याने परिसराची पाणी पातळी वाढली आहे. रस्त्यांची जागा काळवट मातीची असल्याने पाण्यामुळे हे रस्ते काही ठिकाणी खचले आहेत. भविष्यात या रस्त्यांचा भरावाचा स्थर वाढविण्यात येणार असून ते आणखी पक्के करण्यावर भर देण्यात येईल. देवगिरे वस्ती रस्ता, वाळके-नेमाने वस्ती रस्ता, मुसमाडे वस्ती शाळा रस्ता व वाळुंज वस्ती रस्ता या रस्त्याचे अतिक्रमण काढून हे रस्ते मोठे करण्यात आले आहेत. वरील दोन रस्त्यांची कामे झाली असून वाळुंज व मुसमाडे वस्ती रस्त्याचे प्रस्ताव तयार करुन या रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी संजय वाळुंज, चांगदेव वाळुंज, संभाजी वाळुंज, शिरीष वाळुंज, नितीन वाळुंज, सुभाष वाळुंज, रावसाहेब वाळुंज, नीलेश वाळुंज, संभाजी निवृत्ती वाळुंज, शिवाजी उंडे, रमेश देठे, सुभाष घोरपडे, विजय वाळुंज, उत्तम वाळुंज आदी उपस्थित होते.
राहुरी फॅक्टरी भागात आदिनाथ वसाहत वगळता 90 टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत. याठिकाणी घरांच्या पाया पेक्षा रस्ता जास्त उंच असल्याने पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरते. म्हणूनच या भागात भुयारी गटारीचे 50 कोटीचे काम सुरू केले आहे. यानंतर याबाबत योग्य ती उपाययोजना करून रस्त्यांचा प्रश्न सोडविला जाईल. तसेच काही ठिकाणी ओढ्यानाल्यांची जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांनी ओढ्यावरील रस्त्यावर अतिक्रमण करुन गाळपेरची नोंद लावली आहे. ज्या कोणी लोकांनी गाळपेरच्या नावाखाली जमिनी कसवल्या, त्या जमिनी शासनाकडे वर्ग करून रस्त्याची कामे करुन नागरिकांची अडचण सोडण्यास मदत करावी. सांबारी ते डावखर वस्ती जुना बेलापूर रस्त्याला वादामुळे खंड पडला होता. आता हा वाद मिटल्याने या रस्त्याचे देखील काम लवकर सुरू होणार आहे.
– सत्यजीत कदम (नगराध्यक्ष-देवळाली प्रवरा)