सराटी येथे जमिनीला अचानक पडल्या भेगा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी (टेकडवाडी) येथील काही घरांच्या शेजारील रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी भेगा पडल्या आहेत. बुधवारी (ता. 30) सकाळी वस्तीवरील नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे काहीवेळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बोरबन हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावांतर्गतच सराटी (टेकडवाडी) वस्ती आहे. येथील घरांच्या शेजारुन रस्ता जातो. यावर दोन्ही बाजूंनी अचाकन भेगा पडल्याचे रहिवासी अनिल गाडेकर, देवीदास गाडेकर आदी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती सरपंच संदेश गाडेकर यांना दिली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि या संदर्भात महसूल विभागाला कळविले. त्यानंतर कामगार तलाठी दादा शेख, कोतवाल शशीकांत खोंड, घारगाव – बोरबन सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, प्रवीण गाडेकर, आनंथा गाडेकर, सुभाष गाडेकर, शिवाजी गाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दरम्यान, सुरुवातीला थोडीच भेग दिसत होती. त्यानंतर ती वाढत गेली. मात्र, ही भेग नेकमी कोणत्या कारणामुळे पडली आहे ते मात्र अद्याप समजू शकले नाही. दरम्यान यासंदर्भात तहसीलदार अमोल निकम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेच्या अधिकार्यांबरोबर बोलणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. दरम्यान, पठारभागात दाट डोंगररांग आहे. त्यामुळे येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तसेच भूगर्भात हालचाली झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. याचाच प्रत्यय बुधवारी जमिनीला अचानक भेगा पडल्यातून नागरिकांना आला.

जमिनीला नेमक्या भेगा कशामुळे पडल्या आहे ते मात्र समजू शकले नाही. त्याचबरोबर आनंथा घमाजी गाडेकर यांच्याही बोअरवेलचे पाणी गेल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात महसूल विभागाला माहिती दिली आहे. परंतु, या घटनेने येथील नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाने त्वरीत दखल घेवून नागरिकांना मार्गदर्शन करावे.
– संदेश गाडेकर ( सरपंच-बोरबन)
