संगमनेर शहर वैद्यकीयदृष्ट्या ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचे स्वप्न ः श्रीलक्ष्मी संगमनेरात मेडिकव्हर रुग्णालयाचा शुभारंभ; महानगरातील वैद्यकीय सेवा वाजवी दरात उपलब्धतेचा दावा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगातील उच्च तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक यंत्रसामग्री यातून संगमनेर तालुका वैद्यकीय सेवेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न आम्ही पाहिले आहे. त्यासाठी संगमनेरात मेडिकव्हर रुग्णालय सुरु करण्यात आले असून आजच्या स्थितीत परिपूर्ण रुग्णसेवा देणारे केंद्र म्हणून त्याची ओळख आहे. सुसज्ज व्यवस्था आणि रुग्णात देव पाहणारा कर्मचारी वृंद यामुळे संगमनेरकरांना नक्कीच उत्तम वैद्यकी सेवा मिळेल. पैसा मिळविणे हा आमचा मूळ हेतू नसून रुग्णाच्या प्रत्येक पैशाचा त्याला त्याच्या आरोग्यासाठी कसा चांगला वापर होईल हा उद्देश आमचा आहे. म्हणूनच वाजवी दरात महागड्या शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय अशी मेडिकव्हर रुग्णालयाला नवी ओळख मिळाली असल्याचे मत रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी श्रीलक्ष्मी यांनी व्यक्त केले.
संगमनेरात नव्याने सुरु झालेल्या मेडिकव्हर रुग्णालयातील विविध सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी रुग्णालयाकडून सोमवारी (ता.16) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. रुग्णालयाचे संगमनेर केंद्र प्रमुख डॉ. समीर तुळजापूरकर, संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले आदिंसह संगमनेरातील विविध वृत्तपत्र व माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. रुग्णालयाचे केंद्र प्रमुख तुळजापूरकर यांनी मेडिकव्हर रुग्णालयाच्या रुपाने संगमनेर शहर वैद्यकीय क्षेत्रात परिपूर्ण झाल्याचे सांगितले. यापुढे कोणताही दुर्धर आजार असला तरीही त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. मेडिकव्हर रुग्णालयात दाखल रुग्णांवर तंत्रज्ञानाचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करण्यासोबतच उपचारांचा कालावधी कमीत कमी करुन रुग्णाचा वैद्यकीय खर्च कमी करण्यावर अधिक भर दिला जातो असेही त्यांनी सांगितले. पुणे, मुंबईसारख्या शहरात मिळणार्या वैद्यकी सुविधा संगमनेरात उपलब्ध झाल्या असल्या तरीही त्यांचे दर मात्र साधारण आहेत. त्यामुळे मेडिकव्हर रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांना नक्कीच वाजवी दरात आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.