संगमनेरचा साई परिवार पोरका झाला! मालतीताई इंगळे यांचे निधन; मुंबईत सुरु होते उपचार, सायंकाळी पार्थिव संगमनेरात आणले जाणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर आणि संगमनेरचा साई परिवार यांच्यातील अतुट नाते सर्वश्रृत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारा प्रत्येक भाविक या परिवाराशी एकप्रकारे संलग्न आहे. मंदिरात साजर्‍या होणार्‍या वर्षभरातील सर्वच उत्सवांना तडीस नेण्याची जबाबदारी साई परिवार सांभाळीत असतो. या परिवाराचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजे दिवंगत पूज्य पोपटराव इंगळेबाबा व त्यांच्या धर्मपत्नी मालतीताई. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कोविड संक्रमणातून बाबांनी इहलोकीचा त्याग केला होता. त्यांच्या अकस्मात जाण्याच्या धक्क्यातून सावरत असतांनाच आज फाल्गुन वद्य अष्टमीला साई परिवाराला आणखी एक धक्का बसला असून मालतीताई इंगळे यांनीही आपला देहत्याग केला आहे. या वृत्ताने संगमनेरातील साई परिवारावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिवारच आता पोरका झाल्याची भावनिक प्रतिक्रीया साईभक्तांमधून व्यक्त होत आहे. श्रीमती इंगळे यांचे पार्थिव आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार असून रात्री साडेनऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सन 1990 च्या सुमारास संगमनेरातील अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर श्री साईबाबांचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराची संपूर्ण देखभाल विश्‍वस्त मंडळाच्या अधीन होती व व्यवस्थापनाची जबाबदारी पूज्य पोपटराव इंगळे यांनी स्वीकारली होती. त्यासाठी विश्‍वस्त मंडळाने मंदिरालगतच त्यांच्या निवासाचीही व्यवस्था केली होती. गेली तीन दशके पूज्य इंगळेबाबा व त्यांच्या धर्मपत्नी मालतीताई यांनी मनोभावे आपली जबाबदारी पेलतांना साई परिवाराची स्थापना केली व त्या माध्यमातून मंदिरात होणार्‍या वर्षभरातील विविध उत्सवांमध्ये उत्साहाचे आणि भक्तिभावाचे रंग भरले.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पूज्य इंगळेबाबा यांना कोविडचे संक्रमण झाले होते. साईबाबांवरील निस्सीम श्रद्धा आणि प्रबळ इच्छाशक्तिच्या जोरावर त्यांनी कोविडचा पराभवही केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या गुरुपोर्णिमेच्या उत्सवात त्यांना पुन्हा संक्रमण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली व त्यातच 20 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. बाबांच्या अकस्मात जाण्याने संगमनेरातील असंख्य साईभक्तांसह संपूर्ण साई परिवार शोकमग्न झाला. या धक्क्यातून सावरत असतांना आज फल्गुन वद्य अष्टमी पुन्हा एकदा धक्कादायक वार्ता घेवूनच उगवली. आठच दिवसांपूर्वी हवापालट करण्यासाठी आपल्या मुंबईस्थित लेकीकडे गेलेल्या मालतीताई देखील आज साई परिवाराचा लोभ सोडून निघून गेल्या.

साई परिवारातील प्रत्येक सदस्याला मायेचा आधार असलेल्या 75 वर्षीय मालतीताईंना श्‍वसनाचा विकार होता. त्यावरील उपचारांसाठी आठ दिवसांपूर्वी त्या मुंबईला आपल्या लेकींकडे गेल्या होत्या. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच आज (ता.25) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त संगमनेरातील प्रत्येकाला धक्का देणारे ठरले. अतिशय मितभाषी, प्रेमळ आणि सहज स्वभाव असलेल्या मालतीताई साईभक्तांमध्ये नानी म्हणून परिचित होत्या. आज सायंकाळी त्यांचे पार्थिव संगमनेरात आणले जाणार असून रात्री साडेनऊ वाजता येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Visits: 42 Today: 2 Total: 114960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *