कोपरगाव पालिकेचा अतिक्रमणधारकांवर ‘हातोडा’! काही नागरिकांतून नाराजी तर काहींकडून समाधान

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनानाची नजर अचानक शहरातील अतिक्रमणावर पडली आणि काही समजण्याच्या आतच पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पालिकेची फौज शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी रस्त्यावर उतरवली. बुधवारी (ता.23) दुपारी एक वाजता कोणाच्या ध्यानी मनी नसताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पोलीस कर्मचारी पालिकेच्या फौजफाट्यासह मुख्याधिकारी गोसावी हे बसस्थानक परिसरात आले आणि रहदारीला अडथळा होणार्‍या हातगाड्या बाजूला करण्याची लगबग सुरू केली.

कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाने अनेक दिवसांपासून अडचणी वाढल्या होत्या. रहदारीला अडथळा, राजकीय द्वेष, गटातटातून अतिक्रमणे वाढवण्याची मोहीम एकमेकांत स्पर्धेसारखी सुरू झाली. अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे अतिक्रमणाची धगधग सुरु झाली. अशातच 6 एप्रिलला शहरातील नव्याने बांधलेल्या पोलीस ठाणे व बसस्थानक इमारतीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याने त्यांच्या ताफ्याला अडचण येवून नये म्हणून बसस्थानक परिसर व रस्त्याच्या कडेच्या हातगाड्या बाजूला करता करता अचानक अतिक्रमण काढण्याचा सपाटा पालिका प्रशासनाने सुरू केला आणि बघता बघता बसस्थानक परिसरातील अनेक दुकाने, टपर्‍या, हातगाड्याने व्यापलेला परिसर रिकामा केला.

कोणालाही कल्पना नव्हती की आज अतिक्रमण मोहिमेचा हातोडा आपल्यावर पडणार म्हणून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील आरणे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांसह 80 कर्मचारी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह 10 पोलीस कर्मचारी, जेसीबी, ट्रॅक्टर इतर अनेक वाहनांच्या ताफ्यासह संपूर्ण यंत्रणा शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यात मग्न होती. ही मोहीम संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढेपर्यंत राबविणार असल्याची माहीती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली. यावेळी काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी समाधान व्यक्त केले.

शहरातील धारणगाव रस्ता, बसस्थानक परिसर, पूनम टॉकिज, विघ्नेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा परिसर, गांधी चौक, सुदेश टॉकिज ते संपूर्ण मुख्य रस्त्यावर जागोजागी अतिक्रमणे वसली आहेत. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागे संपूर्ण रस्ता पुन्हा अतिक्रमणाने व्यापला आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर हातगाड्या, टपर्‍या दुकाने थाटल्याने शहरातील रहदारीचे रस्ते अरुंद झाल्याने रहदारीला अडथळा होत असल्याच्या तक्रारीही होत आहेत. येवला रस्ता, साईबाबा तपोभूमी, पाण्याच्या टाकीचा परिसर अतिक्रमण धारकांनी काबिज केल्याने शहराचे भकास रूप दिसत आहे. मोठे दुकाने होण्याऐवजी टपर्‍या-छपर्‍यांचे शहर ही ओळख झाली आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांनी स्वतः होवून आपले अतिक्रमण काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी गोसावी यांनी दिला आहे.

Visits: 90 Today: 2 Total: 1107452

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *