पाचेगाव येथे ऊसतोड कामगारांच्या दोन कोप्या जळाल्या दोन्ही कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे. गावात जवळपास बारा ऊस टोळ्या तर बावीस जुगाड आहे. शासनाच्या गट क्रमांक 89/1 येथे ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून रविवारी (ता.20) दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या. यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले.

प्रेमचंद विक्रम चव्हाण उंबरखेड (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील या मुकादमाच्या माध्यमातून बारा ऊस तोडणी कामगार आहेत. हे सर्व बारा ऊस तोडणी कामगार सरकारी जागेत राहतात. सकाळी सर्व काम आटोपून गावालगत असणार्‍या अनिल रामदास भिसे यांच्या ऊस क्षेत्रामध्ये ऊस तोडणी सुरू आहे. त्यामुळे कोप्यावर कोणीही नसताना दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एका कोपीने पेट घेतला. त्याच्या शेजारील कोपीने देखील पेट घेतला. कोप्याने पेट घेतला असताना त्यावेळेस ऊस तोडणी कामगारांचा ट्रॅक्टर चालक सोमनाथ चव्हाण ऊस खाली करून नुकताच आला असता त्याने हे पाहताच पेटलेल्या कोप्यांवर त्वरीत पाणी टाकून विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यात तो भाजून जखमी झाला. पण कोप्यांची आग विझविण्यात अन्य कोप्यांपर्यंत आग पोहोचू न देण्यात तो यशस्वी ठरला.

या आगीत दोन कामगारांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात भाऊसाहेब जाधव व कपील मोरे या दोन कामगारांच्या कोप्या जळून संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. त्यात धान्याच्या पाच गोण्या, कपडे, दोन्ही मिळून दहा ते बारा रुपयांची रोकड खाक झाली. एक बजाज कंपनीची (एमएच 42, 7584) मोटारसायकल अर्धवट अवस्थेत जळाली. गॅस टाकीसह सर्व काही जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. गावातील अशोकचे संचालक यांनी घटनास्थळी पाहणी करून जेवढी मदत मिळवून देता येईल तेवढा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. घटनास्थळी अशोक कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब गुरसळ, दत्तात्रय देवकाते हे देखील मदतीसाठी हजर होते. तलाठी राहुल साठे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती घेतली व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

Visits: 177 Today: 1 Total: 1877354

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *