महावितरणची तीन महिने स्थगिती म्हणजे ‘पुढच्या ओढ्यात चला’! भाजप किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडेंची टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महावितरणकडून थकबाकीपोटी कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू होती. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिने ही मोहीम स्थगित करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. ही घोषणा म्हणजे केवळ ‘पुढच्या ओढ्यात चला’ असे सरकारचे धोरण असल्याची टीका उत्तर नगर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केली.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्यांचा थकबाकी पोटी कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता, तर भाजप किसान मोर्चा, शेतकर्यांची मागणी व अडचणींचा विचार करता राज्य सरकारला उशिरा शहाणपण सुचून पुढील तीन महिने शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडीत केलेल्या शेतकर्यांची कृषीपंपांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकर्यांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यावर भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

खरीप हंगामातील कांदे, ऊस, हरभरा, मका, गहू, विविध चारापिके लागवडीच्या काळातच महावितरण कंपनीने शेतकर्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करुन भरमसाठ नुकसान केली. त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? शेतकर्यांना दिवसा दहा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा केला पाहिजे, रात्रीची वीज देऊन शेतकर्यांना जंगली प्राण्यांच्या दहशतीखाली आपला जीव धोक्यात घालून शेतमालाला पाणी भरावे लागते या दहशतीतून शेतकरी मुक्त झाला पाहिजे, तीन एचपी पंपांना पाच एचपीचे बिल दिले जाते, पाच एचपी पंपांना साडेसात एचपी तर साडेसात एचपी पंपांना दहा एचपी पंपाचे बिल दिले जाते हा अनागोंदी कारभार थांबला नाही तर भाजप किसान मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. वीज अधिनियम 2003 नुसार कृषी वीजबिल ग्राहकांना थकीत विद्युत जोडणी तोडण्यासंदर्भात पंधरा दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक असते. पंरतु वरीष्ठ पातळीवरून असे न करता स्थानिक अधिकार्यांच्या तोंडी आदेशाने जोडणी तोडली जाते, शेतकर्यांना दुसरा कुठलाही पर्याय नसतो, परिणामी हातातोंडाशी आलेली पिके जळून जातात. यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जातो, असेही कानवडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.
