अज्ञात वाहनचालकाची बस थांबवून चालकास मारहाण सायखिंडी फाट्यावरील घटना; सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल सहा महिन्यानंतर राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा रुळावर येण्याचा प्रयत्न करीत असतांना नाशिकहून संगमनेरकडे येणार्या बसचालकासह वाहकाला मारहाण व दमबाजी करण्याची घटना समोर आली आहे. याबाबत सिन्नर आगारात कार्यरत असलेल्या बसचालकाच्या फिर्यादीवरुन महिंद्रा कंपनीच्या टी.व्ही.यू. कारच्या अज्ञात चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचार्यास कर्तव्यापासून रोखून दहशत व मारहाण करणे व धमकी देणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेवून त्यांना तत्काळ गजाआड करण्याची मागणी होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.28) सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेर-नाशिक सीमेवरील सायखिंडी फाट्यावर घडली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगारात सेवेत असलेले बाबुराव अण्णा दहिफळे (वय 31, मूळ रा.शिरुरकासार, जि.बीड) हे आपल्या ताब्यातील ‘नाशिक-पंढरपूर’ (क्र.एम.एच.14/बी.टी.3635) ही बस घेवून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास कर्हे घाट उतरत असताना पाठीमागून महिंद्रा कंपनीची टी.व्ही.यू. (क्र.एम.एच.15/जी.आर.6746) ही कार त्यांची बस ओलांडून पुढे आली.
त्यानंतर सदर कारचालकाने निघून जाण्याऐवजी पाठीमागून येणार्या बसच्या समोर येत वारंवार ब्रेक मारुन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा खोडसाळपणा असेल असे समजून बसचालकाने आपल्या ताब्यातील वाहनाला वेग मर्यादित ठेवून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यातून मनोबल वाढलेल्या ‘त्या’ कारच्या चालकाने आपले माकडचाळे अधिक तीव्र केल्याने बसचालकास वाहन चालवण्यास वारंवार अडथळा येवू लागला. त्यामुळे त्यांनी बस थांबवून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने थेट शिवीगाळ करीत बसचालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असताना बसचे वाहक गंगाराम दिनकर सानप यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या कारच्या माथेफिरु चालकाने त्यांनाही मारहाण करीत दमबाजी केली. बराच वेळ सुरु असलेल्या या वादात बसमधील काही प्रवाशांनीही खाली येवून सहभाग घेण्यास सुरुवात केल्याने घाबरलेल्या कारच्या चालकाने तेथून पलायन केले. त्यानंतर चालकाने तेथून थेट शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतच तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी महिंद्रा कंपनीची टी.व्ही.यू. (क्र.एम.एच.15/जी.आर.6746) या कारवरील अज्ञात चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या कलम 353 सह सरकारी कर्मचार्यास कर्तव्यापासून रोखणे, मारहाण करुन दुखापत करणे व दहशत माजविल्याचे कलम 332 व धमकी दिल्याप्रकरणी कलम 506 नुसार गुन्हा दाखल करीत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे सोपविला आहे.
गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांची विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संप पुकारल्याने मागील सहा महिन्यांपासून लालपरीची चाके थांबलेली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या 22 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा रुळावर येत असतांना बसचालक व वाहकास विनाकारण दमबाजी करीत मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने कर्मचार्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेत दोषी असलेल्या कारच्या चालकाचा तत्काळ शोध घेवून त्याला गजाआड करण्याची मागणीही आता जोर धरीत आहे.