शिर्डीतील द्राक्षाची शेती पाहून आपण थक्क झालो ः रेड्डी तेलंगणा कृषीमंत्र्यांसह अकरा आमदारांचा अभ्यास दौरा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
देश-विदेशात शिर्डीतील प्रसिध्द पेरूची बाजारपेठ म्हणून माहिती होती. पण प्रत्यक्षात येथील द्राक्षाची शेती पाहून आपण थक्क झालो आहे. येथील द्राक्ष उत्पादकांनी देशातील बाजार पेठेबरोबरच यूरोपातील बाजारपेठेचा अभ्यास करावा, असे आवाहन तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी केले आहे.

तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांच्यासह 11 आमदारांचे शिष्टमंडळ अहमदनगर व जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय अभ्यासपूर्वक दौर्यानिमित्ताने शुक्रवारी (ता.18) शिर्डीत आले होते. यावेळी मंत्री रेड्डी यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनी शिर्डी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरविंद कोते यांच्या फार्म हाऊसवर द्राक्ष शेतीची माहिती घेतली.

देशभरातील प्रख्यात फळ उत्पादकांच्या शेतीची माहीती घेण्यासाठी आमचा दौरा असून अरविंद कोते यांनी द्राक्षे शेतीला आधुनिकतेची जोड देवून उच्चत्तम दर्जाची द्राक्षे निर्माण केली आहे. सध्या शेतकर्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शाश्वत बाजारपेठ नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अलिकडच्या काळात युवक मोठ्या पगाराच्या नोकर्या सोडून देत शेती व्यवसायाकडे वळत आहेत. जगातील बाजारपेठांचा ते अभ्यास करत आहेत. आजच्या काळात तरुणांचा शेतीकडील वाढता कल हा शेती व्यवसायाच्या उर्जितावस्थेला हातभार लावणारा ठरेल असा विश्वास मंत्री रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी अरविंद कोते यांनी मंत्री रेड्डी यांच्यासह उपस्थित 11 आमदारांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील द्राक्ष आणि पेरू फळ बागांविषयी कृषीतज्ज्ञ मधुकर दंडवते, विनायक दंडवते, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सदाशिव रोहोम यांच्याबरोबर मंत्री रेड्डी यांनी संवाद साधला. यावेळी विनायक कोते, हौशीराम कोते, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
