शिंदोडी येथे गळ्याला फास बसून मृत्यू झालेल्या तरुणाचा खून? राहुरी तालुक्यातील विविध संघटना आंदोलन छेडण्याच्या तयारीत
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील चिखलठाण येथील योगेश रावसाहेब विघे याचा संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे झालेला मृत्यू हा अपघात नसून वाटाघाटीवरून झालेल्या वादातून केलेला खून झाल्याची धक्कादायक चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
दहा दिवसांपूर्वी लोणी पोलिसांना एका इनोव्हा कारचा संशय आल्याने अधिक चौकशी केली असता त्यात असलेल्या तरुणांनी संगमनेर तालुक्यातील शिंदोडी परिसरातून जाणार्या उच्चदाब वीजवाहिनीच्या तारांची चोरी करताना स्वतःच्या कंबरेला गुंडाळलेल्या रस्सीचा फास बसून चिखलठाण येथील योगेश विघे हा तरुण मृत झाल्याची घटना घडली असल्याचे सांगितले. योगेश यास उपचारासाठी लोणी येथे आणल्याचे सांगितले. मात्र, लोणी पोलिसांनी या आरोपींकडून एक इनोव्हा कार व एक मालवाहतूक टेम्पो ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना माहिती दिली. योगेशचे वडील रावसाहेब विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध भादंवि. 304 व 379 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी वीजवाहक तारा चोरीचा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू होता. हा चोरीचा माल श्रीरामपूर व रामगड येथील गोडाऊनमध्ये उतरवून त्याची विल्हेवाट लावली जाते. सुरुवातीला रामगड येथील एक स्वीफ्ट डिझायर गाडीतून तारेची वाहतूक केली जायची. मात्र, अधिक माल मिळू लागल्याने मालवाहतूक टेम्पोचा वापर होऊ लागला. या चोरीच्या व्यवसायामधून श्रीरामपूरच्या संबंधित व्यापार्याने दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई केली. या व्यापार्यासाठी मयत व आरोपी काम करीत असतानाच यातील विघे याचा संबंधित व्यापार्यांबरोबर हिशोब व वाटाघाटीवरून वाद झाला. त्याचा राग येऊन व्यापार्यांचे नातेवाईक आरोपीने योगेश विघे याचा काटा काढून कपोकल्पित घटना पोलिसांना सांगून दोन्ही ठिकाणच्या पोलिसांची मोठी पूर्तता करून मृत्यू अपघाती असल्याचे दाखविले असल्याची चर्चा होत आहे.
योगेशचा टॉवरवर मृत्यू झाला की त्याला फाशी देण्यात आली? अशी शंका येण्यास अनेक कारणे आहेत. मयत योगेश यास संगमनेरजवळ असताना लोणीच्या दवाखान्यात का आणले? अपघात होता मग रुग्णवाहिकेमध्ये आणण्याऐवजी खासगी गाडी का वापरली? गाडी चालकास का सोडण्यात आले? हा व्यवसाय किती दिवसांपासून सुरू होता, श्रीरामपूर व रामगडच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा का मारला नाही? काही पगार घेऊन चोरी करणार्या मुलांना आरोपी केले. मात्र या व्यवसायात कोट्यावधी रुपये कमवून योगेशच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून संबंधित व्यापार्याला मुख्य आरोपी करण्याची मागणी राहुरी तालुक्यातील विविध संघटनांनी केली असून यासाठी लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.