वरुणराजाच्या ‘रुद्रावतारा’ने पठारभागातील हजारो हेक्टरवरील शेती ‘उध्वस्त’
वरुणराजाच्या ‘रुद्रावतारा’ने पठारभागातील हजारो हेक्टरवरील शेती ‘उध्वस्त’
कोरोनाच्या संकटात बळीराजाला दुहेरी झटका; आर्थिक मदतीची मागणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
निसर्गाची अवकृपा, बाजारभाव, शेतीपूरक साहित्यांची उपलब्धता अशा नानाविध समस्या जणू ‘बळीराजा’च्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत. कर्ज काढून मोठ्या काबाडकष्टाने फुलविलेली हजारो हेक्टरवरील शेती वरुणराजाच्या रुद्रावताराने काही क्षणातच उध्वस्त करुन टाकल्याचे वास्तव आज पठारभागासह तालुक्यात पहावयास मिळत आहे. यंदाच्या वर्षी प्रारंभी हुल दिलेल्या मान्सूनने शेवटच्या टप्प्यात जोरदार आगमन केल्याने सर्वत्र फेर धोरल्याने कोसळधारांनी होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे आधीच कोरोना संकटात पिचलेल्या बळीराजाला आता वरुणराजानेही मोठा धक्का दिल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी मान्सूनने प्रारंभीच्या काळात काहीशी हुल दिल्योन बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी वरुणराजाने दमदार आगमन केल्याने सर्वत्र चैतन्य पसरले होते. मात्र, यंदा वरुणराजाचा मूड काही औरच असल्याने जुलैनंतरही ऑगस्ट महिन्यात जोरदार बरसात केलेला पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेईना. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागासह पठारभागातील छोट्या-मोठ्या शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. एकवेळ तर दुबार पेरणीचे संकट उभे राहील असे वाटत असतानाचा वरुणराजाने बळीराला दिलासा दिला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. शेतकर्यांनी कर्ज काढून, उसनवारी करुन मोठ्या काबाडकष्टाने शेती फुलविण्यासाठी घाम गाळला. खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, कडधान्ये, सेंद्रीय कांदा, भुईमूग, वाटाणा आदी पिके डोलत असतानाच बळीराजाही सुखावला होता. परंतु, नियतीच्या मनात मनात काही वेगळे वरील प्रसंगावरुन दिसून येत आहे.
पठारभागात शनिवारी (ता.19) आणि मंगळवारी (ता.22) दुपारी वरुणराजाचा रुद्रावतार पाहण्यास मिळाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तर पाण्यामध्ये अनेक वाहनेही बंद पडल्याने वाहतुकीस काहीवेळ खोळंबाही झाला होता. दरम्यान, या भागातील ओढे-नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे यापूर्वीच तुडूंब भरुन वाहत असतानाचा शनिवार आणि मंगळवारच्या ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा मोठ्या प्रवाहाने वाहू लागल्याने रस्तेही जलमय झाले होते. तर दुसरीकडे कोरोनाच्या संकटात उत्पादित केलेला मालही कवडीमोल भावाने विकावा लागला असतानाच अतिवृष्टीने खरीप हंगातील हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. उभ्या पिकांत पावसाचे पाणीच पाणी झाल्याने पिके उध्वस्त झाली आहेत. तसेच साठविलेल्या कांद्यालाही पावसाचा तडाखा बसला आहे. याचबरोबर डाळिंब, टोमॅटो आदी नगदी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित पुरते बिघडले आहे. शेतकर्यांची सर्व भिस्त या शेतीवरच अवलंबून असल्याने बळीराजा आता मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, गरज आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची.
एकीकडे ग्रामीण भागासह पठारभागात वाढणारे कोरोनाचे संक्रमण आणि शेतमालाला नसणारा बाजारभाव यामुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता तरी लोकप्रतिनिधींनी आणि मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष देवून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.