विवाहितेच्या आत्महत्येनंतर चोवीस तासांतच प्रियकराचा निर्घृण खून! लागोपाठच्या दोन घटनांनी डोळासणे हादरले; अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणीच झाली हत्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चारित्र्याचा संशय घेवून सतत दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करण्याच्या प्रकाराला वैतागून डोळासणे येथील 31 वर्षीय विवाहितेने सोमवारी पहाटे आत्महत्या केली. तत्पूर्वी त्या विवाहितेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरुन डोळासणेसह जुन्नर तालुक्यातील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला, त्यात मयतेच्या प्रियकराचाही समावेश होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सदर विवाहितेच्या चितेची अग्नी शांत होण्यापूर्वी त्याच स्मशानात तिच्या प्रियकराचाही अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. अवघ्या चोवीस तासांच्या कालावधीत घडलेल्या या दोन घटनांनी डोळासणेसह तालुक्याचा संपूर्ण पठारभाग हादरला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून ‘त्या’ विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मयत प्रियकराच्या आई व बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.

या धक्कादायक घटनेबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोळासणे येथील स्वाती शिवराम क्षीरसागर (वय 31) या विवाहितेने सोमवारी (ता.14) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. तत्पूर्वी संबंधीत विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठीत सागर रघुनाथ भालेराव, समीर रघुनाथ भालेराव, शैला उर्फ हौसा रघुनाथ भालेराव, नंदीनी समीर भालेराव (सर्व रा.डोळासणे), गिरीश थोरात (रा.कळंब, ता.जुन्नर), किसन गायतडके (रा.जुन्नर), मंगेश कर्डिले (नाव व पत्ता माहिती नाही.), रोहिदास उत्तर्डे व रंजना रोहिदास उत्तर्डे (दोघेही रा.आपटाळे, ता.जुन्नर) या दहा जणांनी वेळावेळी सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेवून मयत स्वाती क्षीरसागर यांना शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केली. तसेच, फोन करुन मयतेचा पती, भाऊ, मुले व दीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते.

या घटनेनंतर मयतेने लिहून ठेवलेली चिठ्ठी तिचे पती शिवराम सीताराम क्षीरसागर यांच्या हाती लागल्याने त्यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मयतेची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करीत वरील दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भारतीय दंडविधानच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात करीत याप्रकरणी मयतेच्या प्रियकराची आई शैला उर्फ हौसा रघुनाथ भालेराव व बहीण रंजना रोहिदास उत्तर्डे या दोघींना अटक केली. त्यानंतर डोळासणे येथील स्मशानात मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेनंतर आज (ता.15) सदर विवाहितेचा सावडण्याचा विधी होता. त्यासाठी तिच्या नातेवाईकांसह गावातील मंडळी स्मशानात गेली असता सदर विवाहितेवर अंत्यसंस्कार झालेल्या ओट्याजवळच सागर रघुनाथ भालेराव याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून तेथे गेलेल्या नागरिकांची भंबेरीच उडाली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेतली, काही वेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदनेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्मशानात खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या सागर भालेराव याचे व आत्महत्या केलेल्या स्वाती क्षीरसागर हिचे प्रेमसंबंध होते.

त्यातूनच सागर भालेराव याच्या कुटुंबाकडून मयतेचा सतत शाब्दिक छळ सुरु होता. त्यातून अनेकदा या कुटुंबांमध्ये भांडणेही झाली होती. या प्रेमसंबंधांना भालेराव कुटुंबाकडून होणारा विरोध सदर महिलेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला. मात्र तिचा अंत्यविधी होवून अवघ्या बारा तासांचा कालावधी उलटायच्या आतच त्याच ठिकाणी तिचा प्रियकर सागर भालेरावही मृतावस्थेतच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला असून त्याला सुरुवातीला स्मशानातील लोखंडी अँगलवर आपटण्यात आले, त्यानंतर त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करुन दगडाने मारुन त्याचे पाय मोडण्यात आले. रात्रीच्या अंधारात आणि मयत विवाहितेच्या चितेच्या अग्नी उजेडात झालेल्या या बेदम मारहाणीत सागर भालेराव जागीच मयत झाला. त्यानंतर त्याला तेथेच सोडून त्याचे मारेकरी तेथून निघून गेले.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेनासाठी पालिकेच्या शवागारात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रत्येक दुवे शोधण्याचे काम सुरु असून रात्री स्मशानात कोण गेले होते, मयत तरुणाचा मोबाईलवरुन कोणाशी संपर्क झाला होता, त्याच्या हत्येपूर्वी त्याच्यासोबत आणखी कोण होते अशा सगळ्याच गोष्टींचे पोलिसांकडून संकलन सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दैनिक नायकशी बोलताना व्यक्त केला. प्रेयसी पाठोपाठ अवघ्या चोवीस तासांतच तिच्या प्रियकराचाही अशा पद्धतीने अंत झाल्याने पठारभागासह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.


एरव्ही अपघात, वाहतूक कोंडी आणि काळभेरवनाथाच्या मंदिरात वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटनांमुळे चर्चेत राहणार्‍या डोळासणेत अवघ्या चोवीस तासांत घडलेल्या या दोन घटनांनी खळबळ उडवून दिली. यातील पहिल्या घटनेत सततच्या त्रासाला वैतागून प्रेयसीने आत्महत्या केली, तर तिच्या चितेची अग्नी शांत होण्यापूर्वीच त्याच ठिकाणी तिच्या प्रियकराचाही अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. अवघ्या चोवीस तासांत घडलेल्या या दोन्ही घटनांनी संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 116050

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *