संयुक्त किसान मोर्चात कोणतीही फूट पडलेली नाही! किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांचे स्पष्टीकरण
नायक वृत्तसेवा, अकोले
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोमवारी (ता.14) दिल्लीत झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत फूट पडल्याचे दिसून आले. एकूण 32 पैकी 18 संघटनांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत पुढील आंदोलनांसंबंधी निर्णय झाले. मात्र, किसान मोर्चात फूट पडल्याचे महाराष्ट्रातील पदाधिकार्यांनी नाकारले आहे. पंजाबमधील निवडणूक निकालावरून संघर्ष झाला मात्र फूट पडलेली नाही, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दिल्लीत ही बैठक झाली. दीर्घकाळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाचे या निवडणुकीत काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले होते. काही शेतकरी नेत्यांनी तसे दावेही केले होते. प्रत्यक्षात मात्र या राज्यांत आणि विशेषत: पंजाबमध्येही हा मुद्दा चालला नाही. आता आंदोलनही संपले आहे. आंदोलन काळातच संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. काही संघटनांनी बाहेर पडल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील या बैठकीकडे लक्ष लागले होते. बैठकीला 32 पैकी 18 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावरून किसान मोर्चात फूट पडल्याचे म्हटले जाऊ लागले. पंजाबमधील निवडणुकीत सहभागी होण्यावरूनच हा वाद पेटलेला होता.
यासंबंधी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले, ‘काही माध्यमांनी संयुक्त किसान मोर्चात फूट पडल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. मी दिल्लीतील बैठकीला हजर होतो. संयुक्त किसान मोर्चात फूट पडलेली नाही. पंजाब निवडणुकीच्या मुद्द्यांवर संघर्ष जरूर आहे. चर्चेने त्यावरही मात केली जाईल. मात्र उभी फूट वगेरे काही नाही. एकजूट कायम राहील,’ अशी आशाही डॉ. नवले यांनी व्यक्त केली. दरम्यान, उपस्थित संघटनांच्या बैठकीत पुढील आंदोलासंबंधी निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने हमीभावासंबंधी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे 21 मार्च रोजी देशभरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पुढे हे आंदोलन आठवडाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.