खासदार डॉ.सुजय विखेंना लागले मंत्रिपदाचे वेध…!
नायक वृत्तसेवा, शिर्डी
अहमदनगरच्या विखे घराण्यातील तिसर्या पिढीचे सदस्य खासदार डॉ.सुजय विखे यांना खासदारकीनंतर आता केंद्रात मंत्रिपदाचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच त्यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट आणि त्यानंतर शिर्डीत केलेले सूचक वक्तव्य यामुळे जिल्ह्यात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
विखेंच्या कुटुंबातील स्व.बाळासाहेब विखे हे दीर्घकाळ खासदार होते. काही काळ केंद्रीय राज्यमंत्रीही होते. त्यांचे चिरंजीव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे राज्याच्या राजकारणात, तर त्यांचे वडील देशाच्या राजकारणात असेच जणू वाटत होते. बाळासाहेब विखे पाटलांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ.सुजय भाजपकडून खासदार झाले आहेत. त्यामुळे ते आता देशाच्या राजकारणात सक्रीय राहणार, असे मानले जाते. खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. केंद्रातील भाजपच्या सरकारचे धोरण, तरुणांना अनुकूल आणि विरोधकांना शह देण्यासाठीची रणनिती याचा फायदा घेत मंत्रिपद मिळण्याची अटकळ विखे यांना असल्याचे मानले जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच गेल्या आठवड्यात खासदार डॉ.विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियात शेअर केले. मात्र, आता शिर्डीतील एका कार्यक्रमात डॉ.विखे यांनी यासंबंधी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो, तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन’, असे वक्तव्य त्यांनी केले.
‘आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली आहे. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे. सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चांगले काम करतो आहे. संकट काळात भाजप आमच्या कुटुंबामागे उभा राहिला. खासदार झालो, तरी माझ्यात काही बदल झाला नाही, तसाच तो मंत्री झाल्यावरही होणार नाही.’
– डॉ.सुजय विखे (खासदार, नगर दक्षिण)