स्वर्गीय अशोक भुतडांना मरणोत्तर ‘संगमनेर भूषण’ पुरस्कार संगमनेर पुरोहित संघाकडून प्रथम स्मृतीदिनानिमित्त पुरस्कार प्रदान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरमधील ज्येष्ठ दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अशोक भुतडा यांना त्यांच्या अविस्मरणीय सामाजिक कार्याबद्दल संगमनेर पुरोहित संघातर्फे मरणोत्तर संगमनेर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यात हजारो अंत्यसंस्कार निरपेक्ष भावनेने करणारे स्वर्गीय अशोक भुतडा यांचे मागील वर्षी निधन झाले होते. मात्र कोरोनाच्या बंधनामुळे मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत सर्व विधी उरकावे लागले होते. असंख्य संगमनेरकर नागरिकांना भुतडा यांच्याविषयी भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अशोक सराफ, विश्वनाथ कलंत्री, धनंजय डाके, अमित पंडित, मदन करवा, किशोर कालडा, ओमप्रकाश आसावा, स्वामी जंगम, शिवकुमार भंगीरे, देविदास गोरे, प्रकाश राठी, प्रकाश कलंत्री, श्रीगोपाल पडतानी, रामबिलास बंग, विठ्ठल आसावा यांनी स्वर्गीय भुतडा यांच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वच वक्त्यांनी योग्य व्यक्तीला सन्मानित केल्याबद्दल पुरोहित संघाच्या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी भुतडा परिवरतील स्व. अशोक भुतडा यांच्या धर्मपत्नी सुधा भुतडा, बहीण शोभा काबरा, पुत्र चेतन भुतडा, कन्या ऐश्वर्या भुतडा, स्वप्नाली तापडिया, जावई आनंद तापडिया आदी उपस्थित होते. संदीप वैद्य यांनी प्रास्ताविक तर भाऊ जाखडी यांनी आभार मानले. यावेळी पुरोहित संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.