अखेर पानोडीच्या ‘त्या’ मुन्नाभाईवर गुन्हा दाखल! बातमीचा परिणाम; आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांची फिर्याद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही शैक्षणिक आर्हता नसतांनाही चक्क आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या पानोडीतील ‘त्या’ बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली कित्येक वर्ष पानोडीत सुरु असलेल्या या गोरखधंद्याबाबत बुधवारी दैनिक नायकने जळजळीत प्रकाश टाकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने तातडीची पावले उचलली. आश्वीचे वैद्यकीय अधिकारी कोंडाजी मदने यांनी याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी मंजुमाता दवाखान्याचा चालक असिम दास याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पानोडी येथील एका जुनाट घरात सदरचा मुन्नाभाई डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करीत होता. याबाबत संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकार्यांनी आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांना कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार पानोडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी अमोल उगलमुगले यांच्यासह त्यांनी प्राप्त माहितीच्या ठिकाणी जावून तपासणी केली असता वैद्यकीय पथक पोहोचण्यापूर्वीच संबंधित व्यक्ति तेथून पसार झाली होती.

यावेळी वैद्यकीय पथकाने केलेल्या पाहणीत सदरचा व्यवसाय पानोडीतील एका जुनाट घरामध्ये सुरु होता. सदर घराच्या बाह्य बाजूस मंजुमाता दवाखाना असा फलक असल्याचे व त्यावर डॉ.असिम दास या नावाखाली एन.डी अशी पदवी लिहिलेली त्यांना दिसली. तसेच त्याच फलकावर मुळव्याध, भगंदर, नायटा, गजकर्ण, गुडघेदुखी, कंबरदुखी, थंडी व ताप, सर्दी व खोकला, पोटदुखी इत्यादी आजारांचाही उल्लेख असल्याचे त्यांना आढळले. मात्र पथक तेथे पोहोचण्याच्या पूर्वीच तो तेथून पसार झाला होता.

सदरच्या फलकावर लिहिलेल्या शैक्षणिक आर्हतेबाबत वैद्यकीय पथकाने पडताळणी केली असता एन.डी. (निसर्गोपचार) ही वैद्यक शास्त्रात कोणतीही पदवी नसल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच, फलकावर नाव असलेल्या डॉ.असिम दास या नावाच्या कोणत्याही व्यक्तिचे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायाबाबत नोंदणी झाल्याचे आढळून आले नाही. त्यावरुन सदरची व्यक्ति बोगस असल्याचे स्पष्ट होवून त्याने खोटा फलक लावून पानोडीतील नागरीकांची फसवणूक केल्याची पथकाला खात्री पटली.

त्यामुळे शुक्रवारी (ता.11) आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांनी पोलीस ठाणे गाठून ‘त्या’ मुन्नाभाई विरोधात तक्रार दिली. त्याने महाराष्ट्र मेडिकल कौंसिलची कोणतीही नोंदणी नसतांना तसेच, शैक्षणिक आर्हता नसतांनाही डॉक्टर म्हणून उपाधी लावून गेली अनेक दिवस रुग्णांवर उपचार करुन त्यांची फसवणूक केल्याने असिम दास या बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमाच्या कलम 33 व 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ‘तो’ मुन्नाभाई पानोडीतून परागंदा झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ.शिवाजी पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यात घुलेवाडी व साकूर येथील ग्रामीण रुग्णालयांसह दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वांच्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारे कोणीही बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय उभे करणार नाहीत यावर नियंत्रण ठेवण्याचेही काम दोन्ही ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांचे आहे. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी बोगस डॉक्टर शोध समितीच्या सदस्यही आहेत. असे असतांनाही तालुक्यात जवळपास 66 हून अधिक बोगस डॉक्टर असून ते अशाच पद्धतीने ग्रामीण नागरीकांची फसवणूक करीत आपल्या तुंबड्या भरीत आहेत. याबाबत माध्यमातून आवाज उठल्यानंतर अथवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केल्यानंतरच कारवाई होते हे विशेष.

कोविडच्या काळात अशाप्रकारचे अनेक बोगस व्यवसाय समोर आले होते. त्यातील काही जणांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई देखील केली, मात्र काही प्रकरणात राजकीय दबाव आल्याने इच्छा असूनही प्रशासनाला गुन्हे दाखल करता आले नाहीत. शिबलापूर येथील अशाच एका बोगस डॉक्टरचा शोध दस्तुरखुद्द उपविभागीय अधिकार्यांनी लावला होता, मात्र दबावामुळे ‘तो’ मुन्नाभाई सहीसलामत सुटला. या प्रकरणातही गेली अनेक वर्ष पानोडीत राजरोस वैद्यकीय व्यवसाय सुरु असूनही त्याच्यावर कारवाई झाली नव्हती, मात्र दैनिक नायकने गेल्या बुधवारी (ता.9) या प्रकरणी जळजळीत वास्तव मांडल्यानंतर शुक्रवारी (ता.11) सदरचा गुन्हा दाखल झाला आहे.

