वडगाव पानच्या ग्रामस्थांनी चोरट्यांची टोळी पकडली! तपासात निघाले सराईत; साडेसहा लाखांचा मुद्देमालही हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे एकामागून एक घडणारे प्रकार आणि त्यांचा अभावाने होणारा तपास हे सूत्र प्रचलित असताना आता त्यात काहीसा बदल होताना दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेसह संगमनेरच्या पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड झाल्यानंतर त्यात आता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचीही भर पडली आहे. या प्रकरणातील चोरटे मात्र वडगाव पानच्या ग्रामस्थांनी पकडले आणि त्यांच्या चौकशीतून संगमनेरसह नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे चेहरे समोर आले. विशेष म्हणजे त्यांच्या ताब्यातून तब्बल 6 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले. ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या सहयोगातून हाती आलेल्या या दोघा चोरट्यांनी आत्तापर्यंत नऊ दरोडे घातले आहेत.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार गेल्या बुधवारी (ता.9) तालुक्यातील वडगाव पान येथील किशोरी अमीत लोंढे ही विवाहिता धार्मिक कार्यक्रम आटोपून घराकडे जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना धक्का देवून खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन ओरबाडून दुचाकीवरुन तेथून पळ काढला. मात्र सदर महिलेने लागलीच आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांसह काही तरुणांनी दुचाकीवरुन पाठलाग करीत दोघांना पकडले. यावेळी ग्रामस्थांनी दोघांनाही गावठी प्रसादाचा पाहुणचारही केला.
याबाबत वडगाव पानच्या पोलीस पाटलांनी तालुका पोलिसांना खबर दिल्यानंतर तालुका निरीक्षक पांडूरंग पवार यांनी पथकासह तेथे धाव घेत त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची ओळख विचारता त्यांनी आपली नावे सोनू उर्फ भैरव विश्वनाथ पवार (वय 22) व अविनाश उर्फ आवड्या देवीदास केंधळे (वय 27, दोघेही रा.नायगाव, ता.सिन्नर) असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून वडगाव पानमधील महिलेच्या गळ्यातील ओरबाडलेले गंठनही हस्तगत करण्यात आले. यानंतर दोन्ही आरोपींना उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाकडे चौकशी कामी सोपविल्यानंतर अनेक प्रकरणांचा उलगडा होवू लागला.
तालुका पोलिसांच्या हाती लागलेले दोन्ही चोरटे अत्यंत सराईत असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची उकल केली जावू लागली. त्यातून या दोघांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि शहर हद्दीत यावर्षीच्या एकासह मागील वर्षाचे मिळून पाच, तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव व वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलिकडेच केलेल्या प्रत्येकी एका गुन्ह्याची कबुली या दोघांनी दिली. मुद्देमालाबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर दागिन्यांची विक्री केल्याचे सांगितले.
सदरील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पो.ना.शिवाजी डमाळे, अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, अमृत आढाव व गणेश शिंदे यांच्या पथकाला कामगिरी सोपविली. त्यांनी विविध ठिकाणी छापे घालून यातील 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यापूर्वीही पोलीस उपअधीक्षकांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्धा डझन गुन्ह्यांसह लोणी व सिन्नर तालुक्यात धुमाकूळ घालणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. अर्थात त्या टोळीचा म्होरक्या विनोद उर्फ खंग्या चव्हाण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने उघड झालेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. वरील प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
‘त्या’ प्रकरणात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी जिल्ह्याच्या विविध भागात धुमाकूळ घालणार्या वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील टोळीतील बहुतेक सदस्यांना गजाआड केल्याने या टोळीकडून जिल्ह्यात होणार्या कारवायांना पायबंद बसलेला असताना आता नाशिक जिल्ह्यातील दोघांची टोळी जेरबंद होवून त्यांच्याकडून तब्बल नऊ गुन्ह्यांच्या कबुलीसह तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमालही हस्तगत झाल्याने तालुका पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे येणार्या कालावधीत संगमनेर शहरात सोनसाखळी लांबविण्याच्या प्रकारांमध्ये घट
होण्याचीही शक्यता आहे.