कोपरगाव तालुक्याला दुसर्या दिवशीही गारपिटीचा तडाखा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सोमवारी (ता.22) दुपारनंतर पुन्हा याच परिसरातील रांजणगाव देशमुखमधील सहाणे वस्ती व अंजनापूर भागात गारपीट झाल्याने शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्यासह शासकीय यंत्रणेतील अधिकार्यांनी सोमवारी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नुकसानीची पाहणी होवून नुकसानीचे पंचनामे देखील होतात. परंतु नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास खूप उशीर होतो, याबद्दल शेतकर्यांनी तहसीलदारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.