अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचार्यातील संभाषण फुटले! उत्तरेतील अर्थकारणाचे बिंग फुटल्याने अनेक अधिकार्यांच्या अडचणी वाढल्या
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नेवाशातील एका पोलीस कर्मचार्याचे नगर दक्षिणेतील अप्पर अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्याशी झालेल्या कथित संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने उत्तरेतील अनेक पोलीस अधिकार्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही मिनिटांच्या या फोनमधून सदर कर्मचार्याने उत्तरेतील पोलीस अधिकार्यांच्या अर्थकारणाचे बिंगच फोडल्याने अप्पर अधीक्षकांसह तीन अधिकारी चौकशीच्या सापळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढण्यास काही पोलीस अधिकारीच जबाबदार असल्याचे वास्तवही समोर आल्याने पोलीस दलाला बदनाम करणार्यांविरोधात नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
नूतन अधीक्षक पाटील आजारी असल्याने मध्यंतरी रजेवर गेले होते. त्या दरम्यान त्यांचा पदभार नगरचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्याकडे होता. 16 ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे नावाच्या पोलीस कर्मचार्याने त्यांना फोन करुन त्यांच्याशी उत्तरेतील अर्थकारणावर चर्चा केली. या दोघांमध्ये काही मिनिटे अगदी मनमोकळ्या पद्धतीने झालेले हे संभाषण प्रचंड व्हायरल झाले आणि थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे अप्पर अधीक्षक चौकशीच्या फेर्यात अडकले.
तत्पूर्वी अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा ठपका ठेवीत नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे व श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची मुख्यालयात बदली करुन त्यांची चौकशी सुरु आहे. त्या दरम्यानच 16 ऑक्टोबर रोजीची ‘ती’ ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने नेवासा पोलीस ठाण्यातील संबंधित कर्मचारीही चौकशीत अडकला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काही दिवसांच्या आजारपणाच्या रजेनंतर पुन्हा पदभार स्विकारताच राठोड प्रकरणाचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांना सोपविल्याने राठोड यांच्याकडील अतिरीक्त पोलीस अधीक्षकाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. सध्या डेरे, बहिरट या दोन पोलीस अधिकार्यांसह, गर्जे नामक पोलीस शिपाई आणि अतिरीक्त अधीक्षक राठोड यांची चौकशी सुरु आहे.
व्हायरल झालेल्या या ऑडियो क्लिपमध्ये सदर कर्मचारी उद्या (17 ऑक्टो.) आमच्या साहेबांसह (डेरे) तुम्हाला भेटायला येतो. गेल्या आठ वर्षांपासून आपण उत्तरेतील ‘सेटींग’चेच काम करतो. तुमची सगळी सेटींग लावून ठेवली आहे साहेब, तुम्ही फक्त आदेश करा. नेवाशात मोठमोठाले ‘स्पॉन्सर्स’ तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहेत असे हा कर्मचारी वरीष्ठ दर्जाच्या अधिकार्याला सांगतोय असं या ऑडियो क्लिपवरुन लक्षात येते. त्यावर कथित संबंधीत अतिरीक्त अधीक्षक ‘रेड करायला येवू का?’ असा प्रती सवाल त्या कर्मचार्याला करतात, त्यावर तो नको साहेब काहीच गरज नाही. तुम्ही फक्त आदेश करा, असं तो म्हणताच संबंधित अधिकारी ‘अरे मग करं ना लगेच चालू, नुसता भेटायला येतो की काम करुन येतो’ असे म्हणत आपली बदली तिकडेच व्हायला हवी होती अशी तळतळ करतांनाही ऐकू येते. त्यावर साहेब, इकडे खूप मोठे मोठे लोकं आहेत, वाळू, रेशन आणि गुटख्याचे तर खूप मोठे जाळे आहे असे म्हणत तो कर्मचारी या भागात विक्कार पैसा असल्याचे त्यांना सांगतो. या दरम्यान सदरचे वरीष्ठ पोलीस अधिकारी अमुकतमूकचे कसे आहे अशी विचारणा करताच तो कर्मचारी संबंधित अधिकारी कशा पद्धतीने पैसा गोळा करतो याचे दाखलेच देत असल्याचेही या क्लिपमधून कानावर येते.
या दोघांतील संभाषणाची ही क्लिप थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांच्याच आदेशाने अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांचा पदभार काढून घेण्यात आलेला असून अद्याप त्यांना नियुक्तिचे ठिकाण कळविण्यात आलेले नाही. तर नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे व श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट या दोघांनाही मुख्यालयी हजर होण्याचे आदेश बजावल्यानंतर त्यांची मुख्यालयातच चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच कथीत ऑडियो क्लिपचा जनक असलेल्या गर्जे नामक ‘त्या’ कर्मचार्यालाही मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. या वृत्ताने अहमदनगर पोलीस दलातील अनेक अधिकार्यांच्या कामकाजावरील पडदा बाजूला सरकला असून त्यांच्या अडचणी वाढल्याने जिल्हा पोलीस दलच दहशतीखाली आले आहे.
पोलीस दलाला बदनाम करणार्या, गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांशी हितसंबंध निर्माण करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाईचे पदभार स्वीकारताच संकेत देणार्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता प्रत्यक्ष साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यात एका वरीष्ठ अधिकार्यासह दोन पोलीस निरीक्षक व एक कर्मचारी अडकला असून जिल्ह्यातील आणखी कोणाचा नंबर लागतो याची उत्सुकता ताणली गेली आहे.