कोविड सेंटर सुरू करण्यासाठी माजी आमदारांचा पुढाकार
कोविड सेंटर सुरू करण्यासाठी माजी आमदारांचा पुढाकार
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात कोविड सेंटर सुरू करण्याची मागण्याची काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी आणि सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटरबाबत माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.

यामध्ये माजी आमदार पिचड म्हणाले, मी कोविड सेंटर उभे करतो, प्रशासनाने आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, औषधोपचार आदी सुविधा द्याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या दोनच कोविड सेंटर सुरू आहेत. त्यापैकी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ति सहकारी साखर कारखान्याने 100 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. तर दुसरे खानापूर येथे आहे. अजून 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काही दाते व समाजसेवी संघटना पुढे येण्यास तयार आहेत. तरी प्रशासनाने या कोविड सेंटरसाठी आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा यंत्रणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पिचड यांनी पत्रातून केली आहे.

