नेवाशातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवाशातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात भाजपचा उपक्रम
नायक वृत्तसेवा, नेवासा
पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सेवा सप्ताह उपक्रमात भाजपच्यावतीने मंगळवारी (ता.22) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते तर भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रक्तदान करणार्या दात्यांना प्रमाणपत्राचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, भाऊसाहेब फुलारी, कृषीतज्ज्ञ एकनाथ भगत, शहराध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक सचिन नागपुरे, माजी सरपंच सतीश गायके, अजित नरुला, प्रताप चिंधे, कुणाल बोरुडे, अंबादास उंदरे, महेश पवार, गंगाधर रासने, राजेंद्र बोरुडे, गजानन गवारे, शरद जाधव, उपदेश मोटे उपस्थित होते.
नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी सुरक्षित अंतराचे पालन करत रक्तदान केले. संकलित रक्त हे अहमदनगर येथील जनकल्याण रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सुशांत पारनेरकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. सदर रक्त कोविड उपचार घेत असलेल्या रुग्णांना पाठविण्यात येणार आहे.