ज्ञानदानाला वाहून घेतलेली आधुनिक शिक्षिका! वृषाली कडलग ः जागतिक महिला दिन विशेष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा शाळेच्या उपक्रमशील व ज्ञानप्रिय उपाध्यापिका वृषाली कडलग यांनी शिक्षण क्षेत्रात कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळेच त्यांना आत्तापर्यंत विविध संस्था व व्यक्तींनी पुरस्कार देऊन काम करण्यास प्रेरणा दिली आहे. आज महिला दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला छोटासा धांडोळा.

संगमनेर इनरव्हील क्लबच्या माध्यमातून आधुनिक शिक्षिका वृषाली कडलग यांनी तालुक्यातील 21 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून आनंदी शाळा प्रकल्प राबविण्यात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. जिल्हा परिषद देशमुख मळा या शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थिती 100 टक्के वाढविण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम, हस्तकला, कला, कार्यानुभव, गणित, कोपरे सजवणे, औषधी वनस्पतींची परसबाग, ‘एक मूल एक झाड’ याप्रमाणे वृक्षारोपण, विद्यार्थी हस्तलिखित, ओला-सुका कचर्‍याचे नियोजन, सुसज्ज ग्रंथालय, रोटरी हॅन्ड वॉश स्टेशन – सॅनिटायझर मशीन, गांडूळ खत निर्मिती, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, सोनू-मोनू बचत बँक, वाचन प्रेरणा दिन, एका पानाचे वाचन, विज्ञानाचे प्रयोग, परिसरातील पिके व स्थळांची माहिती, माजी विद्यार्थी मेळावा, पोषण माह सप्ताह, आठवडे बाजार, बाल आनंद मेळावा इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले.

याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त कला मंच पत्रा शेड, प्रशस्त मुख्यालय, शाळेच्या बोलक्या भिंती, रंगरंगोटी, खेळणी, लोकसहभागातून शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी सहा लाख रुपयांचे योगदान मिळवत जिजाऊ बिग्रेडच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्य केले. संसार सांभाळून शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून आदर्श योगदान देणार्‍या महिलांना सलग 4 वर्षे गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रकल्प राबविला. त्यामुळेच खर्‍या अर्थाने त्या ज्ञानप्रिय शिक्षिका ठरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शैक्षणिक व महिला सक्षमीकरणासाठी मानव विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेलीा आहे. गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार, शैक्षणिक कार्यासाठी इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळालेली आहेत. सध्या त्या उपाध्यापिकेची जबाबदारी सांभाळण्यासह गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा म्हणूनही पदभार सांभाळत आहेत. त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *