खोटे लग्न लावून आर्थिक फसवणूक करणारी टोळी संगमनेरात! खांडगावच्या तरुणाची फसवणूक; नवरीसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उपवर तरुणांना हेरुन मध्यस्थामार्फत त्यांचे लग्न लावून देणार्या व नंतर माहेरी जात असल्याचे सांगून नवरीच पसार होण्याचा धक्कादायक प्रकार आता संगमनेरातूनही समोर आला आहे. या प्रकरणात संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील 35 वर्षीय तरुणाची फसवणूक झाली असून त्याने दोन लाख रुपये देवून कोपरगाव येथील तरुणीशी विवाह केला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या आठच दिवसांत आपले लग्न नव्हेतर फसवणूक झाल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी नवरी मुलीसह तिची खोटी आई, भाऊ व अन्य एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या टोळीने यापूर्वीही अशाचप्रकारे दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव येथील एका शेतकरी कुटुंबात दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे वय 35 वर्ष झाल्याने त्याचे आई-वडील आपल्या दोन्ही मुलांसाठी मुलीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांनाही मुलगी शोधण्यास सांगीतले होते. त्यानुसार सावरगाव घुले येथे राहणार्या त्यांच्या एका नातेवाईकाने शिंदोडी येथील त्यांच्या मित्राच्या मदतीने सावळीविहीर (ता.कोपरगाव) येथील स्थळ आणले. मात्र त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील असेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार 22 फेब्रुवारी रोजी त्या दोघांसह उपवर मुलगा व त्याचे चार नातेवाईक सावळीविहीर येथे मुलगी पाहण्यासाठी गेले.
यावेळी मीना कस्तुरी नावाच्या महिलेने आपली मुलगी उपवर असल्याचे भासवून तिला त्यांच्यासमोर उपस्थित केले. मुलगी मुलाला पसंत पडल्यानंतर तिच्या आईने मुलाचे घर पाहण्याची इच्छा व्यक्त केली व त्यानंतरच लग्न करण्याची अटही घातली. त्यानुसार त्याचदिवशी ती सगळी मंडळी खांडगाव येथे आली. मुलाचे घर पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलीची आई मीना कस्तुरी, भाऊ आवेश व त्यांंच्या सोबतच्या अपेक्षा उर्फ राणी शेख यांनी लागलीच लग्नाला होकर दिल्याने त्याच दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या दोघांचेही लग्न लावून देण्यात आले, या सोहळ्याचे छायाचित्रणही केले गेले. त्या दोघांचे लग्न लागताच ठरल्याप्रमाणे मुलाच्या चुलत्याने शिंदोडीच्या मध्यस्थामार्फत मुलीच्या आईला एक लाख रुपयांची रक्कम रोख स्वरुपात सोपविली. त्यानंतर सावळीविहीर येथून आलेली ही मंडळी रात्रीच निघून गेली.
24 फेब्रुवारी रोजी मुलीची कथित आई मीना कस्तुरी हिने फोन करुन लग्नाचे प्रतिज्ञापत्र (नोटरी) करायची असल्याने त्या दोघांनाही कोपरगाव येथे बोलावले. त्यानुसार नवरा व नवरीसह संबंधित मध्यस्थ व मुलाचे तिघे नातेवाईक कोपरगावला गेले. तेथे वकीलामार्फत रीतसर लग्नाचे प्रतिज्ञापत्र (नोटरी) करण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे राहिलेली एक लाखाची रक्कम मुलीच्या आईला देण्यात आली व नवरीमुलीसह ती सगळी मंडळी पुन्हा खांडगावला आली. गेल्या बुधवारी (ता.2) रात्री आठच्या सुमारास ‘त्या’ मध्यस्थाचा मुलाला फोन आला व त्यांनी सांगितले की ‘तू लग्न केलेली मुलगी नाशिक पोलीस स्टेशनला मिसींग नोंद झालेली आहे.’ हे ऐकून लग्नाच्या आनंदात असलेल्या नवर्या मुलाच्या पायाखालची जमीनच हादरली. या प्रकारावरुन त्या मुलाचा मुलीबाबत संशयही बळावला.
त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबासमोरच तिच्याकडे विचारणा केली असता त्या मुलीने अतिशय धक्कादायक माहिती दिली. सदरची मुलगी मुळची नाशिकमधील असून तिचे आई-वडील तेथेच राहातात. तिचे खरे नाव योगिता नरसिंग कस्तुरी असल्याचे तिने सांगितले. लग्नापूर्वी महिन्याभरापासून ती कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर येथे शीतल अनिल मोरे हिच्यासोबत राहु लागली. यावेळी तिने आपला भाऊ म्हणून वावरणारा मुलगा वास्तवात आवेश शेख असल्याचेही सांगितले व यापूर्वी अशाचप्रकारे पाटणा व मालेगाव येथील तरुणांंकडून एक लाख रुपये घेवून आपले लग्न लावण्यात आले होते अशी माहिती सांगत मला माझ्या आई-वडीलांकडे नाशिकला जायचे असल्याचे ती म्हणू लागली.
हा सगळा प्रकार ऐकून त्या शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकारातून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना सांगितला. त्यावर त्यांनी लागलीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी नवरी मुलगी योगिता नरसिंग कस्तुरी (रा.जेलरोड, नाशिक), तिची खोटी आई शीतल अनिल मोरे (रा.सावळीविहीर), खोटा भाऊ आवेश शेख व अपेक्षा शेख उर्फ राणी (दोघेही रा.उपनगर, नाशिक) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अशाच प्रकारच्या मुली दाखवून उपवर तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार गेल्यावर्षी जिल्ह्यातील नेवासा व श्रीरामपूर तालुक्यातून समोर आले होते. त्याचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी अशाप्रकारे फसवणूक करणारी टोळीही पकडली होती. त्यानंतर किमान जिल्ह्यातील असे प्रकार थांबल्याचे चित्र निर्माण झालेले असतांना आता कोपरगाव तालुक्यातील महिलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशी फसवणूक करणारी टोळी समोर आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या टोळीच्या चौकशीतून आणखीही काही प्रकरणं समोर येण्याची दाट शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातही अशा काही घटना घडल्याची चर्चा असून इभ्रतीमुळे तक्रारी झालेल्या नाहीत. त्यासाठी शहर पोलिसांकडून गांभीर्याने तपास होण्याचीही गरज निर्माण झाली आहे.