माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चौघांवर अॅट्रॉसिटी! ‘सेलिब्रेशन’मध्ये झालेले वाद अंगलट; पीडित तरुणीच्या पुरवणी जवाबावरुन कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सोमवारी (ता.९) अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन’मध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर चौघांवर दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा प्रकार आता हॉटेल मालकासह माजी नगरसेवक नितीन अभंग आणि त्यांच्या भावाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणात सुरुवातीलाच आपल्यासोबत उद्धट वर्तन करीत अश्लील हावभाव व शेरेबाजी झाल्याचा आरोप एका तीस वर्षीय तरुणीने केला होता. त्यावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला, मात्र पीडितेने आपली तक्रार आणि प्रत्यक्षात दाखल कलमांबाबत असमाधान व्यक्त करीत नियमानुसार गुन्हा दाखल न झाल्यास जीवाचे बरेवाईट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली असून पीडितेच्या पुरवणी जवाबावरुन हॉटेल सेलिब्रेशनच्या मालकासह माजी नगरसेवक नितीन अभंग व त्यांचे बंधू प्रवीण यांच्यावर विनयभंग, मारहाण व दंगल माजवण्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्या सर्वांच्या अडचणींमध्ये आता मोठी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात सोमवारी (ता.९) रात्री अकराच्या सुमारास अभंग पेट्रोल पंपाजवळील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये वेळ संपल्याचे कारण देत एका तीस वर्षीय तरुणीला जेवण नाकारण्यात आले होते. तत्पूर्वी संबंधित तरुणी बराचवेळ त्या हॉटेलमध्ये बसून असल्याने हॉटेलच्या कर्मचार्यांनी तिला ऑर्डर देण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यातून अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी झाल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला होता. या दरम्यान पीडितेसोबत आलेल्या चौघा तरुणांनी हॉटेल मालकासह तेथील कर्मचार्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत हॉटेलातील सामानाची तोडफोड केली.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०९ प्रमाणे गुन्हाही दाखल केला होता. तर हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन तोडफोड व मारहाण करण्यासह या गदारोळात दीड तोळे वजनाची सोनसाखळी व रोकड लांबविल्याचा आरोप केल्याने योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे व दीपक रणसुरे या चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडित तरुणीने संबंधित माजी नगरसेवक व हॉटेल मालकांवर राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्याचा गंभीर आरोप करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ एक दिवसाचे आंदोलनही केले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना पीडितेने ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम सांगत आपल्यासोबत अश्लिल भाषेत जातीवाचक प्रकार घडल्याचे, मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.

यानंतर गेल्या शनिवारी (ता.१४) संबंधित पीडितेने सोमवारी (ता.९) हॉटेल सेलिब्रेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार लिखित स्वरुपात कथन करीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना पाठवला व त्याच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षकांनाही पाठविल्या होत्या. त्याची दखल घेत उपअधीक्षक वाघचौरे यांनी मंगळवारी (ता.१७) पीडित तीस वर्षीय तरुणीचा पुरवणी जवाब नोंदवून घेतला असून त्यावरुन पप्पू अभंग, माजी नगरसेवक नितीन अभंग, त्यांचे बंधू प्रवीण व अंकुश अभंग यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४, ३५४ (अ), १४३, १४७, १४८, १४९, ३२३ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी) तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

शुल्लक कारणावरुन घडलेल्या या भयंकर प्रकारात पीडित तरुणीच्या सोबत असलेल्या चौघांवर सुरुवातीला गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित होते. त्यानुसार पीडितेने पूर्वी दाखल केलेली तक्रार व त्यावरुन दाखल गुन्ह्याबाबत असमाधानही व्यक्त केले होते. त्यातून हॉटेल सेलिब्रेशनच्या मालकासह या वादात उडी घेणार्या माजी नगरसेवकाच्या अडचणी वाढण्याची शक्यताही निर्माण झाली होती. आता मंगळवारी पोलीस उपअधीक्षकांनी पीडितेच्या तक्रारीनुसार वाढीव कलमांन्वये गुन्हा दाखल केल्याने माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चौघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संगमनेर शहराच्या इतिहासात एखाद्या नगरसेवकावर अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्याची नोंद दुर्मिळ असल्याने या वृत्ताने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात घडलेला हा प्रकार खरेतर सामंजस्याने सोडवण्याची आवश्यकता होती. मात्र दोन्ही बाजूने त्यात अततायीपणाच अधिक दिसून आल्याने आता एका पार्टीवर जबरी चोरीचा तर दुसर्या पार्टीवर विनयभंग, दंगल, मारहाण व अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या प्रत्येकी चौघांना कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे स्वतः करीत आहेत.

