राहुरी भाजप तालुकाध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला मिळणार अधिक बळकटी
नायक वृत्तसेवा, राहुरी
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक व भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. या पक्षप्रवेशाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट झाली आहे.
मुंबई येथे बुधवारी (ता.2) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत भनगडे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी भनगडे यांच्यासमवेत गणेगाव सोसायटीचे अध्यक्ष बापूराव कोबरणे, उपसरपंच पोपट कोबरणे, माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, बबन कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी सुयोग नालकर, अनिल घाडगे, बापू जगताप, किरण कोळसे, किरण गव्हाणे, गंगाधर हारदे, पप्पू माळवदे उपस्थित होते. दरम्यान, मुंबई येथे आज प्रातिनिधीक स्वरूपात मोजक्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लवकरच गणेगाव येथे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार आहे. यावेळी ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य व हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे अमोल भनगडे यांनी सांगितले.