लेखी हमी नंतरही पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई नाही! आंदोलकांचा संताप; कत्तलखान्यांच्या विरोधात आजपासून हिंदुत्त्ववाद्यांचा पुन्हा एल्गार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांना अर्थपूर्ण पाठबळ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या निलंबनासह अन्य काही मुद्द्यांवर गेल्या आठवड्यात पुकारण्यात आलेले व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या लेखी हमीनंतर ‘स्थगित’ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आजपासून पुन्हा सुरु झाले आहे. दिलेल्या मुदतीत वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आंदोलक संतप्त झाले असून आत जोपर्यंत निलंबन होत नाही, तोपर्यंत माघार नाहीच असा एल्गार पुकारण्यात आला आहे. त्यासाठी पुढील काही दिवसांची तयारीही करण्यात आली असून प्रसंगी यंदाच्या विजयादशमीला प्रांत कार्यालयासमोरच रावण दहनाचा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास सदरचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात 2 ऑक्टोबर रोजी भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह अहमदनगरच्या पोलीस पथकाने संगमनेरातील जमजम कॉलनी स्थित पाच साखळी कत्तलखान्यांवर छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी आजवरच्या कारवायात सर्वाधीक 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 71 जिवंत जनावरे हस्तगत केली होती. या कारवाई दरम्यान नवाज कुरेशी याच्या वाड्यातून यतीन जैन यांनी एक डायरीही हस्तगत केली होती. त्या डायरीत काही पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि दोघा पत्रकारांची नावे असल्याचेही त्याचवेळी समोर आले होते. त्यावरुन येथील कत्तलखान्यांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचेही उघड झाले होते. या कारवाईची छायाचित्रेही सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्याने तालुक्यात मोठा जनक्षोभ उसळला होता.

राज्यातील आजवरच्या कारवायांमध्ये सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या छाप्यानंतर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्रित होवून येथील कत्तलखाने उध्वस्त करण्यासह या कत्तलखान्यांना आर्थिक हितसंबंधातून पाठबळ देणार्‍या पोलीस निरीक्षकांचे निलंबन करावे यासाठी सोमवारी (ता.4) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून निषेध मोर्चा काढीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी दिवसभर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा व जोपर्यंत सक्षम अधिकारी आंदोलकांना सामोरे येणार नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. आंदोलक आणि अधिकारी यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेर्‍या होवूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने आंदोलन चिघळण्याचीही शक्यता निर्माण झाली होती.

यावेळी आंदोलकांकडून गेल्या तीन वर्षात गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या कारवायांमधील आरोपी तेच ते असतानाही त्यांच्यावर हद्दपारीच्या कारवाया का करण्यात आल्या नाहीत. वर्षभरातील गुन्ह्यांचे अवलोकन केल्यास कारवाया झाल्या मात्र तपासी पोलीस अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक त्रृटी ठेवून आरोपींना निर्दोष सुटण्यास मदतच केली आहे. अशा प्रकरणांची छाननी करुन दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनाही त्या गुन्ह्यात सहआरोपी करावे. संगमनेर शहरात उपविभागीय अधिकारी दर्जाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी वास्तव्यास असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे येथील बेकायदा कत्तलखाने सुरु ठेवण्यात पोलीस निरीक्षकांप्रमाणेच पोलीस उपअधीक्षकही जबाबदार आहेत. या दोघांवरही निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करावी.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजवरच्या दहा वर्षात साडेतीनशेहून अधिकवेळा कारवाया झाल्या आहेत. या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात सेवा बजावून गेलेल्या अधिकार्‍यांसह छापा पडल्यानंतर जप्त केलेल्या गोवंश मांसाचे नमूने तत्काळ घेवून त्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असताना त्यात हलगर्जीपणा करण्यात आला. त्याला दोषी असलेल्या सर्व अधिकार्‍यांसह पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईसह गांधी जयंतीच्या दिवशी कारवाई झालेले पाचही कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर तहसीलदारांनी त्याच दिवशी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना 48 तासांत सदरचे कत्तलखाने उध्वस्त करण्याचे आदेश दिले व त्यानुसार बुधवारी (ता.6) सदरचे कत्तलखाने पाडण्यातही आले.


तर उर्वरीत चारही मागण्या पोलीस विभागाशी संबंधित असल्याने व पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांवरच आंदोलकांचा आरोप असल्याने जोपर्यंत सक्षम अधिकारी येवून कारवाईची लेखी हमी देत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे सोमवारी (ता.4) दुपारीच संगमनेरात आल्या होत्या. मात्र त्यांनी आंदोलनस्थळाला पाठ दाखवित शासकीय विश्रामगृहावरुनच आंदोलकांना सात दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वास दिले होते. त्याची मुदत सोमवारी सायंकाळी संपल्याने शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांची भेट घेवून त्यांना स्मरणपत्र देत आमच्या मागण्यांवर वरीष्ठ अधिकार्‍यांनी लेखी हमीपत्र देवूनही कारवाई न केल्याने ठरल्यानुसार आजपासून (ता.12) पुन्हा ठिय्या आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा दिला.

त्यानुसार आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावर पुन्हा एकदा आंदोलक जमा झाले असून त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला आहे. आंदोलन सुरु झाल्यापासूनच संतप्त झालेल्या आंदोलकांकडून भ्रष्ट अधिकार्‍यांच्या नावाने शिमगा सुरु असून जोरदार घोषणाबाजीही सुरु आहे. वरीष्ठांकडून सात दिवसांत कारवाईची लेखी हमी असतानाही ठरलेल्या मुदतीत कोणतीच कारवाई न झाल्याने आता आर या पारची लढाई सुरु झाल्याचे प्रशांत बेल्हेकर, कुलदीप ठाकूर, अ‍ॅड.श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर करपे व अमोल खताळ या आंदोलकांचे नेतृत्त्व करणार्‍या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे येथून पुढचा काही काळ हे आंदोलन सुरुच राहण्याची व ते चिघळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

तर रावण दहनही आंदोलनस्थळीच..
आजपासून सुरु करण्यात आलेले ठिय्या आंदोलन वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेचा परिपाक आहे, त्यामुळे आता जोपर्यंत पोलीस निरीक्षकांचे निलंबन करुन त्यांना मुख्यालयात जमा केले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही स्थितीत थांबणार नाही. विजयदशमीला हिंदू धर्मियांमध्ये रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे, यावर्षी भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्याची गरज असल्याने प्रांताधिकार्‍यांच्या कार्यालयासमोरच भ्रष्ट अधिकार्‍यांच्या स्वरुपातील रावणाचे दहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे, त्यामुळे सदरचे आंदोलन दीर्घकाळ चालले तरीही चालविण्याची आंदोलकांची तयारी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Visits: 4 Today: 2 Total: 21184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *