छत्रपतींना बदनाम करण्यासाठी एका वर्गाकडून नियमित काम ः तांबे राज्यपालांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद; राज्यभरातून वक्तव्याचा निषेध
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर युवक काँग्रेसने देखील या वादात उडी घेतली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्यपालांवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
शिर्डी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता ऑनलाइन नोंदणी अभियानाच्या दरम्यान सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले. ‘समर्थ नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?’ या राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेताना तांबे यांनी हा फुले, शाहू, आंबेडकरांचा बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यावर चालणारा महाराष्ट्र असल्याचे म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी एक वर्ग नियमित काम करत असतो. त्या वर्गाच प्रतिनिधीत्व करणारी ही मंडळी आहेत, अशी टीका तांबे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या भावना कालच्या भाषणातून बाहेर पडल्या. राज्यपाल जेव्हा पाहुणा म्हणून या राज्यात येतात त्यांनी या राज्याची संस्कृती, येथील लोकांच्या भावना समजून काम केलं पाहिजे. इथे येऊन ते आमची मने दुखवण्याचे काम करत असतील तर ते राज्याच्या हिताचे नाही. हे वाक्य चुकून आलं, असं मला वाटत नाही. राज्याची घडी बिघडवण्यासाठीच हे वाक्य समोर आणले आहे, असा गंभीर आरोप करत सत्यजीत तांबे यांनी राज्यपालांवर थेट निशाणा साधला आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले की, 2014 पासून ते गेल्या दोन वर्षात जे राजकरण सुरू आहे हे चुकीचं आहे. एकमेकांना प्राण्यांची उपमा देणे, एखाद्याच्या घरापर्यंत जाणे हा सगळा प्रकार पाहिला तर सामान्य कुटुंबातील युवक राजकारणापासून लांब राहील. ही चिंतेची बाब असून यावर सर्वच राजकीय पक्षांनी विचार करणे गरजेचं असल्याचं मत तांबे यांनी व्यक्त केलं आहे.