खाद्यतेलापाठोपाठ आता साखरेचीही केली परस्पर विक्री! मोठे रॅकेट असण्याची शक्यता; संगमनेर शहर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात सूरत येथील खाद्यतेल व्यापार्याची फसवणूक केल्याची घटना घडली होती. त्यातच सोमवारी (ता. 19) पुन्हा 16 लाख 66 हजार रुपयांची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी न पोहोचवता चोरी करून दुसर्याच व्यापार्याला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आता खाद्यतेलापाठोपाठ साखर चोरीच्या घटनाही घडू लागल्याने व्यापार्यांत एकच खळबळ उडाली आहे.

सध्या कोविडचे संकट सुरू असून, महागाई देखील गगनाला भिडलेली आहे. त्यातच खाद्यपदार्थ चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. फलटण येथील मंजुश्री करवा यांनी संगमनेरमधून साखर खरेदी केली होती. ती साखर प्रकाशचंद ओसवाल या व्यापार्यास पाठविण्यास सांगण्यात आले होते. मात्र ट्रकचालकांनी ही साखर परस्पर इतर व्यापार्यांना विकली. साखर न मिळाल्याने संबंधित व्यापार्याने चौकशी केली असता आपल्याला साखर मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी संबंधित ट्रकचालकांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत करवा यांना संपर्क करुन शिवीगाळ व दमदाटी केली.
साखरेचा अपहार करून ती परस्पर विकल्याचे करवा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना संपूर्ण हकीगत कथन करुन मंजुश्री करवा यांनी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी मनोज गोकुळदास मानधने (रा. एरंडोल, जि. जळगाव), अज्ञात वाहनचालक (क्रमांक एमएच. 18, बीए. 5787), व दुसरा वाहनचालक (क्र.एमएच. 09, एचएच. 2462) अशा तिघांविरुद्ध गुरनं. 368/2021 भादंवि कलम 406, 420, 507 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहे.

गेल्या महिन्यात सुमारे तीस लाख रुपयांच्या खाद्यतेल अपहाराची घटना घडली होती. संबंधित व्यापार्याला खाद्यतेल पोहोच न करता मध्येच अपहार केला होता. या पद्धतीनेच साखर चोरी करुन परस्पररित्या दुसर्या व्यापार्याला विकल्याचे समोर आल्याने व्यापार्यांत खळबळ उडाली आहे. या घटनांवरुन खाद्यपदार्थ चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

