भारत निवडणूक आयोगाकडून मतदार जागृती स्पर्धांचे आयोजन! सुमारे तेरा लाखांची बक्षिसे; अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे : डॉ.मंगरुळे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती स्पर्धांचे आयोजन केले आहे. ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडिओ मेकींग व भित्तीचित्र अशा पाच प्रकारात या स्पर्धा होणार असून तीन गटात त्याची विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातून चार पारितोषिके काढली जाणार असून बक्षिसाची एकूण रक्कम 12 लाख 75 हजार 500 रुपये आहे. याशिवाय प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना भारत निवडणूक आयोगाचे मानचिन्ह असलेल्या आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, सामान्य नागरीकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करुन त्यांच्या सक्रीय सहभागातून भारतीय लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानेच मतदानाबाबत स्वयंजागृती होणे आवश्यक असल्याने देशातील सर्व वयोगटातील नागरीकांना या मोहीमेतंर्गत होत असलेल्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सामुहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विशद् करण्याच्या मध्यवर्ती संकल्पेनवर आधारत कल्पना व मजकुरांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील संस्थात्मक गटात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ अशा केंद्र अथवा राज्य सरकारकडून नोंदणीकृत असलेल्या संस्थांचा समावेश असेल. व्यावसायिक गटात गायन, व्हिडिओ मेकींग अथवा भित्तीचित्र या व्यवसायाशी संलग्न असणार्या व्यक्तिंना या गटात सहभागी होता येईल. या गटातील विजेत्या स्पर्धकाला आपली व्यवसायिक श्रेणी सिद्ध करावी लागेल. तर तिसर्या गटात हौशी स्पर्धकांना सहभाग घेता येईल. विविध पाच प्रकारात होत असलेल्या या स्पर्धेतील प्रश्नमंजूषा कार्यक्रमातून जिज्ञासू व्यक्तींना सहभागी करुन भारतीय निवडणुकीबाबत त्यांची जागरुकता पातळी जाणून घेतली जाणार आहे. सुलभ, मध्यम व अवघड अशा तीन श्रेणींमध्ये होणार्या या स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता करणार्या प्रत्येकाला आयोगाकडून ई-प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. या स्पर्धेतील प्रश्नमंजूषा उपक्रमात विजेत्या ठरणार्या स्पर्धकांना भारत निवडणूक आयोगाचे मानचिन्ह कोरलेल्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील तर घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 20 हजार, द्वितीय विजेत्यास 10 हजार, तृतीय विजेत्यास 7 हजार 500 व सहभागी होणार्यांपैकी 50 स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून दोन हजार रुपयांचे पातिोषिक देण्यात येणार आहे. गीत, व्हिडिओ मेकींग व भित्तीचित्र स्पर्धेसाठी तीन श्रेणीत एकूण 11 लाख 41 हजार रुपयांची प्रत्येकी चार बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आयोगाच्या <https://ecisveep.nic.in/contest> या संकेतस्थळावर भेट द्यावी. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका पूर्ण तपशिालासह voter-contest@eci.gov.in <mailto:voter-contest@eci.gov.in> येथे ई-मेल करावी. ई-मेल करताना स्पर्धकाने आपले पूर्ण नाव आणि श्रेणीचा उल्लेख करावा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 मार्चपूर्वी प्रवेशिका जमा होणे आवश्यक आहेत. संगमनेर मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार अमोल निकम व निवडणूक नायब तहसीलदार विनोद गिरी यांनी केले आहे.