मुकुंद चिलवंत नवे जिल्हा माहिती अधिकारी चार वर्षांच्या सेवेनंतर दीपक चव्हाण यांची मंत्रालयात बदली
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
जिल्ह्यात घडणार्या विविध घडामोडी, शासकीय व प्रशासकीय निर्णय, वरीष्ठ नेते व मंत्र्यांचे दौरे, विविध निवडणुकांची माहिती माध्यमांना देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयात खांदेबदल झाला आहे. मागील चार वर्षांपासून जिल्ह्याच्या माहिती अधिकार्याची धुरा वाहणार्या दीपक चव्हाण यांची आता मंत्रालयात बदली झाली असून त्यांच्या जागी औरंगाबादचे माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्याचे मावळते माहिती अधिकारी चव्हाण यांनी सोमवारीच त्यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली आहेत.
दीपक चव्हाण यांनी आपल्या चोर वर्षांच्या सेवाकाळात जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या माध्यम प्रतिनिधींशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. मागील दीड वर्षापासून राज्यासह संपूर्ण जिल्हा कोविड संक्रमणाचा सामना करीत असताना माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपक चव्हाण यांनी मर्यादेच्या पलिकडे जावून आपले कर्तव्य बजावले. तीन मंत्र्यांचा जिल्हा सांभाळण्याची कसरत करतांना त्यांनी आपल्यातील व्यवस्थापन गुणांची दाखवलेली झलक मंत्री महोदयांनाही त्यांच्या प्रेमात पाडणारी ठरली. कोविडच्या कालावधीत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या, मृत्यूचे आकडे, ऑक्सिजनची उपलब्धता अशी विविध माहिती अचुकपणे माध्यमांना पुरविण्याची भूमिकाही त्यांनी अगदी सहजपणे पार पाडली. त्यांच्या याच कामामुळे त्यांना वर्षभराची मुदतवाढही मिळाली.
चव्हाण यांच्या जागी आलेले औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलकर यांनी सलग सात वर्ष मुंबई येथील वृत्तचित्र शाखेचा कार्यभार अगदी उत्तमप्रकारे सांभाळला. त्या जोरावरच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या जिल्हा माहिती अधिकारीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. या कालावधीत त्यांनी औरंगाबादेतील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करुन आपल्या जनसंपर्काची साखळी अधिक घट्ट केली. या कालावधीत त्यांनी ‘सहज संपर्क निर्माण करणारा अधिकारी’ अशी आपली वेगळी ओळखही निर्माण केली. सोमवारी अहमदनगरच्या जिल्हा माहिती कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींशी मैत्रीचे संबंध निर्माण करणार असल्याचे सांगितले. मावळते माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करताना काना, मात्रा व वेलांटी नसलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लक्षात आणून दिले.