वारुंघुशी येथे जन्मदात्याचा खून; आरोपी फरार राजूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल; शोधासाठी पथक रवाना

नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुर्‍हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेला काळू सतत करत असे. याबद्दल त्याला कारावासाची शिक्षाही झाली होती. मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढलाच. ही धक्कादायक घटना अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील वारुंघुशी येथे घडली आहे.

याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वारुंघुशी येथील बोरवाडी येथे रामदास लक्ष्मण घाणे (वय 60) हे आपल्या तीन मुले व तीन मुलींसह राहतात. त्यांना राजू, बाळू, काळू ही तीन मुले आहेत व तीन मुली आहेत. राजू बाहेर गावी राहतो तर बाळू पुणे जिल्ह्यात आपल्या पत्नीसह रोजगारासाठी जातो व महिना-दोन महिन्यांनी घरी येत असतो. काळू हा घरीच असतो. शनिवारी बकर्‍या विक्रीवरून बापलेकात भांडणे झाली. त्यातच काळूने आपल्या बापाचा खून केला. काळू घाणे याने (रामदास घाणे) बापाचा खून करून 25 किलोचे दोन दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले व घरातील आई आणि बहिणीला ‘तुम्ही कुणाला सांगाल तर तुमचाही काटा काढेल’ असा सज्जड दम दिला. मात्र मंगळवारी त्याचा भाऊ बाळू घाणे घरी आला आणि त्याने आईला म्हतारा कुठे विचारले असे विचारताच आई रडू लागली अन् त्याचवेळी काळू घरातून पळून गेला. ही घटना राजूला कळताच तोही पळत आला.

गुरुवारी (ता.24) सकाळी दोघा भावांनी विहिरीत असलेले आपल्या बापाचे प्रेत वर काढले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक नितीन खैरनार, हेडकॉन्स्टेबल डगळे, काळे उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी राजूर पोलिसांनी आरोपी मुलगा काळू रामदास घाणे याच्याविरोधात भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यासाठी पथक पाठवले आहे.

Visits: 79 Today: 2 Total: 1110609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *