दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका घेवून जाणारा टेम्पो जळून खाक! पेपरफुटीच्या धोक्यामुळे भोपाळमध्ये छापले होते पेपर; मात्र बोर्डात पोहोचण्यापूर्वीच टेम्पोला आग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षभरात राज्यातील विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटण्यासह निकालात झालेल्या घोटाळ्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र ढवळले असतांना आता त्यात दुर्घटनेचीही भर पडली आहे. यासर्व प्रकारांपासून किमान दहावी-बारावीच्या परीक्षा तरी घोटाळा मुक्त रहाव्यात यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महाराष्ट्राऐवजी चक्क मध्यप्रदेशच्या राजधानीतून प्रश्नपत्रिका छापून आणल्या. मात्र पुणे विद्यापीठात पोहोचण्यापूर्वीच आज पहाटे टेम्पोला लागलेल्या आगीत त्या जळून खाक झाल्या. आता नव्याने पुन्हा प्रश्नपत्रिका छापाव्या लागणार असून येत्या 4 मार्चपासून बारावीच्या परीक्षाही सुरु होत आहे. सध्यातरी सदरचा प्रकार दुर्घटना दिसत असला तरीही यात घातपाताची शक्यताही नाकारता येणार नसल्याने पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात राज्यातील दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा होत आहेत. मात्र गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या विविध परीक्षांचे पेपर परीक्षेपूर्वीच फुटण्याच्या घटना तसेच परीक्षा झाल्यानंतर प्रत्यक्ष निकालात फेरफार करण्याचे प्रकार समोर आल्याने राज्याचा शिक्षण विभाग गोंधळात सापडला होता. त्यामुळे यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका राज्यात न छापता त्या अन्य ठिकाणांहून छापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे विभागाच्या परीक्षा मंडळाने सदरच्या प्रश्नपत्रिकांची छपाई मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून छापून घेण्याचा निर्णय घेतला होता.
दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई झाल्यानंतर त्या सुरक्षितपणे पुण्याला पोहोचवण्यासाठी भोपाळहून मनोज चौरसिया हा चालक आपला आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम.पी.36/एच.0795) घेवून पुण्याकडे निघाला होता. त्याच्यासोबत संबंधित छपाई कंपनीचा व्यवस्थापक रामविलास राजपूतही होता. आज पहाटेच्या सुमारास त्यांचा टेम्पो चंदनापूरी घाट चढून वरती आला असता टेम्पोच्या पाठीमागील बाजूस आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लागलीच आपला टेम्पो रस्त्याच्या कडेला घेत व्यवस्थापक राजपूतसह आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र वाहनात कागदी प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे असल्याने सदरच्या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. त्यात वाहनासह त्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. याबाबतची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत संगमनेर नगरपरिषद व स.म.थोरात कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण केले. काही वेळातच घारगावचे निरीक्षक सुनील पाटीलही फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी या जळीतामुळे खोळंबलेली वाहतुक सुरळीत केली. या घटनेत सदरचा टेम्पो आणि त्यातील दहावी-बारावीच्या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
सदरची घटना समजताच पुण्याहून राज्य परीक्षा मंडळाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सदरच्या वाहनातील सर्व प्रश्नपत्रिका पूर्णतः जळालेल्या नसून त्यातील काही गठ्ठे अर्धवट अवस्थेत जळालेले असल्याने या अधिकार्यांच्या उपस्थितीत त्याच ठिकाणी यासर्व गठ्ठ्यांना पूर्ण जाळण्याची प्रक्रीया सुरु आहे. येत्या 4 मार्चरोजी होणार्या बारावीच्या परीक्षेसाठी जळालेल्या प्रश्नपत्रिकातीलच प्रश्न असतील की फुटीचा धोका विचारात घेवून त्या नव्याने तयार केल्या जातील याबाबत कोणतीही निश्चित माहिती समजलेली नाही.