भंडारदरा धरण सुरक्षेचा प्रश्न एकदा रामभरोसे! धरण परिसरातील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बंद

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
ब्रिटीशकालीन धरण म्हणून प्रसिद्ध असणार्‍या भंडारदरा धरणावरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे कायमस्वरुपी बंद असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे ब्रिटीशकालीन धरण समजले जाते. तसेच या धरणाच्या सभोवताली एका बाजूला धरणाचा सांडवा, तर धरणाच्या पायथ्याशी धरणाचा बगीचा, त्या बगीच्यात राजकपूरचा आवडता असलेला अंब्रेला धबधबा तर धरणाची दगडी बांधकाम असलेली भिंत असून दरवर्षी सदर ठिकाणे पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी धरणावर व परिसरामध्ये भंडारदरा धरण शाखेकडून काही वर्षापूर्वी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यामध्ये धरण प्रवेशद्वार, भिंती, विश्रामगृह, धरणाचा सांडवा, बगीचा यांचा समावेश आहे.
या कॅमेर्‍यांमुळे संपूर्ण धरण परिसरावर नजर ठेवली जाते. धरणाचे बॅक वॉटरही या कॅमेर्‍यात नजरबंद केले जाते. पंरतु गत तीन ते चार वर्षांपासून भंडारदरा धरणावरील सी. सी. टी. व्ही. कॅमेर्‍यांचे फक्त बुजगावणेच उभे असून हे कॅमेरे कायमस्वरुपी भंडारदरा धरण शाखेकडून बंद ठेवण्यात आले आहेत. तर भंडारदरा धरणाच्या दोन्हीही प्रवेशद्वारांवर आपण सी. सी. टी. व्ही. च्या कार्यकक्षेत आहात असा फलक मात्र रुबाबात झळकत आहे. कॅमेरे बंद असल्याकारणाने अनेक पर्यटक प्रवेद्वारावर नेमलेल्या कर्मचार्‍यांशी हमरी तुमरीवर येतात, प्रसंगी धक्काबुक्कीही करतात. कॅमेरे बंद असल्याने भांडण करणारे पर्यटक ओळखू देखील येत नाहीत.

शिर्डी येथील मंदिराची दुबई येथील अतिरेक्यांकडून रेकी झाल्याचे वार्तांकन अनेक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले असून त्यामुळे भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बनला आहे. सदर धरणावरील कॅमेरेच बंद असल्याने अहमदनगर येथून नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारीही धरणावर अल्पप्रमाणात सुरक्षेस असल्याचे दिसून येते. तर धरणावर कायमच तळीरामांची रेलचेल असल्याचे निदर्शनास येते. भिंतीवरही अनेकदा पर्यटक कुणाचीही परवाणगी न घेता खुष्कीच्या मार्गाने प्रवेश करत असतात. यापूर्वी पाण्यामध्ये अनेक आत्महत्या झालेल्या आहेत. त्यावेळी पोलीस यंत्रणेलाही या कॅमेर्‍याच्या फुटेजची मदत होत असते. मद्यधुंद पर्यटकही धांगडधिंगा करत असतात, धरणाचे विश्रामगृहही भिंतीवरच आहे. या सर्वांवर नियत्रंण ठेवण्यासाठी सदर कॅमेरे कायमस्वरुपी सुरू असणे गरजेचे आहे.

धरण सुरक्षितेसाठी असणारे ऑडिट झाले त्यावेळी अधिकार्‍यांनी नोंदी घेतल्या. आम्ही देखील निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यास तांत्रिक मान्यता मिळाल्यास कामास सुरुवात होईल.
– अभिजीत देशमुख (शाखा अभियंता)

Visits: 117 Today: 1 Total: 1099775

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *