अरे देवा! आता लष्करी अधिकार्‍याच्या पेहरावातील इसमाकडून तरुणांची फसवणूक! स्थानिक गुन्हे शाखेने खोटा ‘लेफ्टनंट’ पकडला; संगमनेरातील तरुणांचीही फसणूक झाल्याचा संशय..


नायक वृत्तसेवा, अहमदनगर
मंत्रालयात ओळख आहे, नेत्यांच्या जवळ आहे असे भासवून बेरोजगार तरुणांची व त्यांच्या कुटुबियांची फसवणूक झाल्याच्या बातम्या नेहमीच कानावर येतात. मात्र आता अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले असून चक्क लष्करातील लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍याचा अगदी हुबेहुब पेहराव करुन गावोगावी हिंडणार्‍या आणि सावज शोधून त्यांच्याकडून मोठी कमाई करणार्‍या खोट्या लष्करी अधिकार्‍याला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यातून जेरबंद केले आहे. आत्तापर्यंत त्याने संगमनेर व राहुरी तालुक्यातील अनेकांना गंडा घातला असून त्याच्याकडून बनावट कागदपत्रे, नियुक्तिपत्रे व स्वतःसाठी वापरत असलेले लष्कराचा गणवेश व खोटे ओळखपत्रही हस्तगत करण्यात आले आहे. या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली असून फसवणूक झालेल्या तरुणांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


याबाबत लष्कराच्या दक्षिण विभागातील गोपनीय विभागाला माहिती प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्याबाबत त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या व सोबतच लष्कराचे काही अधिकारीही पोलीस पथकासोबत दिले. या संयुक्त पथकाने राहुरी व संगमनेर तालुक्यातील विविध ठिकाणी चौकशी केली असता या महाशयांचे कारनामे समोर येवू लागले. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला जेरबंद करणे आवश्यक बनले.


स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या पथकाकडून लष्करी अधिकारी बनून फिरणार्‍या व बेरोजगार तरुणांकडून लष्करात नोकरीचे अमिष दाखवून पैसे उकळणार्‍या या इसमाचा शोध सुरु असतांना तो संगमनेर तालुक्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याचा माग काढीत थेट पठारावरील मांडवे बु. गाव गाठले. यावेळी समोरचे दृष्य पाहून पोलीस पथकासह त्यांच्यासोबत असलेले लष्करी अधिकारीही थबकले. मांडवे गावात आपल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनावर ‘कमांडो’ असे अक्षर लिहून एक इसम लष्करातील लेफ्टनंट कमांडर पदाच्या अधिकार्‍याचा पेहराव करुन बिनधास्त वावरत असल्याचे त्यांना दिसले.


पथकाने त्याला थांबवून त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव नवनाथ सावळेराम गुलदगड (वय 24, रा.आग्रेवाडी, ता.राहुरी) असल्याचे सांगितले. लष्करात कोठे सेवेत आहात या प्रश्‍नाचेही त्याने अगदी सहज उत्तर देतांना आपण बेंगळुरु येथे लेफ्टनंट पदावर असल्याचे सांगितले व आपले ओळखपत्रही दाखविले. खोटे बोलतांनाही त्याचा ओथंबलेला आत्मविश्‍वास पाहून पथकातील अधिकारीही भांबावले, मात्र लागलीच जागेवर येत त्यांनी बेंगळुरु लष्करी छावनीशी संपर्क साधला असता वास्तव समोर आले. त्यानंतरही संबंधित भामटा उडावाउडवी करीत होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.


त्याने दिलेल्या माहितीनुसार आपण लष्करी अधिकारी असल्याचे भासवून बेरोजगार तरुणांना हेरुन त्यांना नोकरीचे अमिष दाखवायचो. समोरच्या व्यक्तिला विश्‍वास बसण्यासाठी नेहमी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, त्यावर कमांडो अक्षर लिहून व अंगात नेहमी लष्करी गणवेश परिधान करुनच वावरत असल्याचे त्याने सांगितले. या कालावधीत त्याने वेगवेगळ्या लोकांना कर्नल, कॅप्टन व सुभेदार अशा पदावर असल्याचा भरवसा पटवून देत त्याने संगमनेर व राहुरी तालुक्यातील अनेक तरुणांची फसवणूक करुन त्यांच्याकडून आठ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचेही समोर आले.


यावेळी पोलिसांनी त्याची व त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात लष्करी गणवेश, ओळखपत्रे, गणवेशावर लावायचे मानचिन्ह, नावाची पाटी, फित, नोकरीचे अमिष दाखवून वेगवेगळ्या तरुणांकडून भरुन घेतलेले अर्ज, छापील बनावट नियुक्तीपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड असा मुद्देमाल आढळून आला. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी राहुरीत आणले व राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आत्तापर्यंत त्याने अनेकांची फसवणूक करुन आठ लाख रुपये जमा केल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


या कारवाईत गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पो.हे.कॉ.संदीप घोडके, भाऊसाहेब कुरुंद, संदीप पवार, पो.ना.शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, देवेंद्र शेलार, पो.कॉ.मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, राहुल साळुंके, विनोद मासाळकर व लष्कराच्या गुप्तवार्ता शाखेचे अधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *