जिल्हा गुन्हे शाखेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
जिल्हा गुन्हे शाखेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष झाले केंद्रीत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा पोलीस दलाला प्रतिक्षा असलेल्या ‘एलसीबी’ प्रभारी नियुक्तीचा फैसला अंतिम टप्प्यात असून आज अथवा उद्या त्यावरील ‘सस्पेन्स’ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास तीस पोलीस निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात उकल न होणार्या गुन्ह्यांच्या तपासाची मुख्य जबाबदारी पेलणार्या या विभागात कोणाची वर्णी लागणार याबाबत सामान्यांमध्येही आता उत्सुकता निर्माण झाली आहे. या खात्याचे प्रभारी सक्षम, चाणाक्ष आणि अनुभवी असावेत असा अलिखित नियम आजवर पाळला गेला आहे. कडव्या शिस्तीचे अधिकारी म्हणून समोर आलेले आणि पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी कठोर निर्णयाची तयारी ठेवणारे पोलीस अधीक्षक मनोज पाटील ‘एलसीबी’ची माळ गळ्यात घालताना या गोष्टींचा सारासार विचार करुनच निर्णय घेण्याची दाट शक्यता असल्याने स्पर्धेतील निरीक्षकांची धाकधूकही वाढली आहे.
साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून अहमदनगरचा राज्यात लौकिक आहे. गोदावरी नदीच्या प्रवाहाने समृद्ध झालेला उत्तरेतील भाग आणि अवर्षणग्रस्त आणि विकासाची वाणवा असलेला दक्षिणेचा भाग अशा दोन श्रेणींमध्ये चौदा तालुके असलेल्या राज्यातील या अवाढव्य जिल्ह्यात 29 पोलीस ठाण्यांच्या मदतीने शांतता व सुव्यवस्थेसह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाते. पोलीस दलातील निर्णय क्षमता जलद व्हावी यासाठी नगर उत्तर व दक्षिण अशा दोन भागांसाठी स्वतंत्रपणे अप्पर पोलीस अधीक्षक पदाचीही साधारणतः दोन दशकांपूर्वी निर्मिती झाली. या उपरांतही जिल्ह्यात वारंवार गुन्हेगारी घटनांचा उद्रेक होत असल्याने थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) महत्त्वही जिल्ह्यात अधोरेखीत झाले.
सध्या याच शाखेच्या प्रभारी नियुक्तीचे वारे वाहत असून जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उर्मी बाळगणारे पोलीस निरीक्षक या पदासाठी जंग पछाडीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ चर्चेत असलेल्या मात्र अद्यापही नियुक्तीची प्रतीक्षा असलेल्या या खुर्चीवरील अधिकार्याची नियुक्ती लांबण्यामागे पोलीस अधीक्षकांचे स्पर्धेतील प्रत्येकाला जोखूण घेण्याचे तत्त्व अधिक ठळकपणे समोर येत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘एलसीबी’ प्रभारी अधिकार्याची नियुक्ती ‘गुणांकनावर’ आधारितच असेल असेच काहीसे संकेत मिळत आहेत.
या स्पर्धेत आजही अनेक नावे आहेत. त्यात अगदी सुरुवातीपासून चर्चेत असणारे व यापूर्वी नगर कोतवालीसह नेवासा व श्रीरामपूर या गुन्हेगारांचे मोठे आश्रयस्थान असलेल्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी म्हणून काम केलेल्या आणि आजही तेथील जनतेच्या मनात धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या कनिष्ठ अधिकारीपदाच्या कार्यकाळात दीड दशकांपूर्वी देशातील सर्वात मोठी मोहरमची मिरवणूक ठरणार्या नगरमध्ये दंगल उसळली होती. त्यावेळी आपल्या मोजक्या सहकार्यांसह मैदानात शड्डू ठोकून त्यांनी ती नियंत्रणात आणली होती. दोन वर्षांपूर्वीही त्यानी हिच मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी विसर्जीत करण्याचे दिव्य यशस्वी करुन दाखवले होते. याशिवाय नेवासा व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी बजावलेले कर्तव्य आजही तेथील लोकांच्या स्मरणात आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधवही या स्पर्धेत टिकून असून गुन्ह्यांची उकल करण्याची त्यांची हातोटी आणि धाडसी स्वभाव यामुळे या शाखेसाठी त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. अवर्षणग्रस्त भाग म्हणून परिचित असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारीचा आणि सामाजिक असमानतेचा प्रश्नही नेहमीच समोर येत असतो. मात्र अशावेळी गुन्हेगारांना कठोर शासन आणि सामाजिक सौहार्द यांचा सुरेख मिलाफ घालण्यातही त्यांचा वेगळा हातखंडा असल्याचे त्यांच्या कार्यक्षेत्रातून बोलले जाते. त्यामुळे या पदासाठी त्यांचा दावाही दमदार मानला जात आहे.
अकोले, नगर, राहुरी अशा वेगवेगळ्या ठाण्यांचा कार्यभार सांभाळणारे व संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळालेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुखही या स्पर्धेत आहेत. या पदासाठी त्यांनीही जोरकस प्रयत्न सुरु ठेवलेे आहेत. त्यांच्यासोबतच शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे व संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले निरीक्षक अभय परमारही या पदासाठी इच्छुक असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील ‘गुणांकना’च्या जोरावर एलसीबी प्रभारी निवडतात की राजकीय दबावातून हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील 29 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घडणार्या मात्र उकल न होणार्या गुन्ह्यांच्या तपासासह जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबादार स्थानिक गुन्हे शाखेची असते. जिल्हा अंतर्गत एकमेकांशी सांगड असलेल्या गुन्ह्यांचा गुंताडा सोडवणे, गुन्ह्याच्या मुळाशी जावून नेमके आरोपी गजाआड करणं यारखी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या या शाखेचा प्रभारी अधिकारी तितकाच सक्षम, चाणाक्ष आणि अनुभवी असावा असा आजवरचा प्रघात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक इच्छुकांच्या गर्दीतून ‘तो’ कसा हुडकून काढतात याकडे आता जिल्हा पोलीस दलासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.