देवळाली प्रवरा येथील हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापा 1 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 6 आरोपींविरुद्ध गुन्हे
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी (ता.16) छापा टाकून उध्वस्त केले. या कारवाईत पथकाने 1 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना देवळाली प्रवरा येथे अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु अड्डे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्यास पथकास छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने त्याठिकाणी छापेमारी करीत दारु तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारु यांचा जागेवरच नाश केला. तर बापू गायकवाड याच्याकडून 42 रुपये किंमतीचे 600 लिटर कच्चे रसायन व दोन हजार रुपये किंमतीची 20 लिटर तयार दारु, सोमनाथ बर्डे याच्याकडून 28 रुपये किंमतीचे 400 लिटर कच्चे रसायन व 1 रुपये किंमतीची 10 लिटर दारु, रमेश गायकवाड याच्याकडून 31 हजार 500 रुपये किंमतीचे 450 लिटर कच्चे रसायन व 1500 रुपये किंमतीची 15 लिटर दारु, आशाबाई बाळासाहेब गायकवाड हिच्याकडून 24 हजार 500 रुपये किंमतीचे 350 लिटर कच्चे रसायन व दोन हजार रुपये किंमतीची 20 लिटर दारु, वैभव गायकवाड याच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर कच्चे रसायन व दोन हजार रुपये किंमतीची 20 लिटर दारु, ज्ञानेश्वर रामकिसन भागवत याच्याकडून 900 रुपये किंमतीच्या 15 (देशी बॉबी संत्रा) दारुच्या बाटल्या असा एकूण 1 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वरील सहा आरोपींविरोधात राहुरी पोलिसांत मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या कारवाईमुळे देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून महिलांनी कारवाईचे जोरदार स्वागत केले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोहेकॉ. सुरेश औटी, प्रभाकर शिरसाठ, पोकॉ. नितीन शिरसाठ, शशीकांत वाघमारे आदिंनी केली आहे.