मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी!
मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी!
कोपरगाव पत्रकार संघाची तहसीलदारांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्यात कोरोना महामारीने उग्ररुप धारण केले आहे. सर्व सामान्यांसह माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलेले नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोपरगाव येथील मयत पत्रकाराच्या कुटुंबियांना शासनाने घोषणा केल्याप्रमाणे 50 लाखांची मदत द्यावी. त्याचबरोबर राज्यातील सर्व पत्रकारांचा ओराग्य विमा उतरावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाला तर त्यांनाही आरोग्य व पोलीस कर्मचार्यांप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही मदत केली जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दि. 3 जून, 2020 रोजी केली. मात्र तीन महिने लोटले तरी सरकारी आदेश काढला नाही. पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असा स्पष्ट केले होते. या गोष्टीलाही पंधरा ते वीस दिवस झाले तरी निर्णय अद्याप झालेला नसून तो निर्णय तातडीने घेण्यात यावा. तसेच संतोष पवार, पांडुरंग रायकर या पत्रकारांना योग्य तो उपचार न मिळाल्याने यांचा मृत्यू झाला. पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्या संबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा. अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारांवर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मनीष जाधव, तालुका उपाध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष हाफीज शेख, विनोद जवरे, विजय कापसे, अक्षय काळे, राजेंद्र जाधव, शिवाजी जाधव, लक्ष्मण जावळे, फकिरराव टेके, अमोल गायकवाड, रवींद्र जगताप, गहिनीनाथ घुले, योगेश गायके, संजय भवर, अनिल दीक्षित, सुमित थोरात, रवींद्र साबळे आदी उपस्थित होते.