कोतूळमध्ये आठवडे बाजारातून शेतकर्यांना गावाबाहेर हाकलले! ग्रामसेवकाच्या कार्यपद्धती आणि भूमिकेबाबत व्यक्त होतेय आश्चर्य

नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना विषाणूंनी पुन्हा हाहाकार केल्याने प्रशासन अतिक सतर्क झाले आहे. कोरोना संचारबंदीत अकोले तालुक्यातील कोतूळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठवडा बाजारच्या दिवशी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्यांना गावाबाहेर हाकलले तर व्यापार्यांना भर चौकात जागा दिल्याने ग्रामसेवकाच्या कार्यपद्धती आणि भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोतूळमध्ये गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आठवडा बाजार बंद होता. दोन महिन्यांपूर्वी हा बाजार सुरू झाला. दरम्यान, वर्षात कोतूळात भाजीपाला विकणारे किमान शेकडाभर नवीन व्यापारी तयार झाले. हे व्यापारी गावातील मोक्याच्या जागेवर चारचाकी गाड्या, हातगाड्या लावतात आणि दुप्पट नफ्याने भाजीपाला विकतात. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी व गर्दी नियंत्रण कायदा ग्रामपंचायत प्रशासनाने लागू केला. त्यामुळे आठवडा बाजार बंद केला. शेतकर्यांनी, व्यापार्यांनी गर्दी करू नये, असे ग्रामसेवक व तलाठी व्यापार्यांच्या बैठकीत ठरले. कडक अंमलबजावणी सुरू झाली.

मात्र, यात कोतूळ बाजारतळावर व्यापार्यांचा दररोज भाजीबाजार सुरू झाला. किमान पन्नास व्यापारी येथे बसू लागले. शेतकरी आला तर त्याला जागाच मिळू दिली जात नाही. बसलाच कुठे तर ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी हाकलून देतात. शेतकरी त्यांचा भाजीपाला या व्यापार्यांना अत्यंत कमी भावात देऊन घरी जातात, कमी भावात घेतलेला माल हे व्यापारी दुप्पट रकमेने विकतात. राजूर, अकोले येथे बाजारच्या दिवशी शेतकर्यांना बाजारात सामाजिक अंतर ठेवून जागा दिल्या जातात. मात्र, कोतूळच्या ग्रामसेवकाच्या कार्यपद्धती आणि भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुधवारी आठवडा बाजारच्या दिवशी जवळे कडलग येथील एक शेतकरी सोनाका जातीचे द्राक्षे पन्नास रुपये किलोने विकत होता. व्यापारी मात्र ऐंशी रुपयाने विकत होते. एक तासात या शेतकर्याला गावाबाहेर हाकलले. बोरी, वाघापूर येथील शेतकरी पंधरा रुपये किलोने बटाटा विकत होते. मात्र, शेतकरी हाकलल्याने बटाटा वीस ते पंचवीस रुपये झाला. टोमॅटो पन्नास रुपये किलो, शेवगा ऐंशी, मिरची ऐंशी ते शंभर रूपये किलो झाली. धामणाव आवारी येथील एका शेतकर्याने ही मिरची चाळीस रुपये किलोने जागा नसल्याने विकली होती.

कोतूळमध्ये गेल्या महिन्यापासून शेतकर्यांना आठवडा बाजारात भाजीपाला घेऊन आलो तर बसू दिले जात नाही. मात्र, बाजारतळावर व्यापार्यांचा दररोज बाजार भरतो. बोरी येथील एक शेतकरी ढसढसा रडलेला मी पाहिला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देणून हकीगत सांगणार आहे.
– गौतम रोकडे (शेतकरी, बोरी)
