कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी घारगाव ‘बंद’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी घारगाव ‘बंद’
व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय; नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील गावांचे आणि वाडी-वस्त्यांचे व्यापाराचे मुख्य केंद्र घारगाव आहे. विशेष म्हणजे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अनेक प्रवासी वाहने येथे चहा, नाश्ता व जेवणासाठी थांबा घेतात. तसेच परिसरातील नागरिकांची खरेदीसाठी येथे मोठी गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी एकत्र येत दर सोमवारी संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतरच्या दुसर्‍या बंदला (ता.21) व्यावसायिकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधालये आणि बँकसेवा वगळण्यात आलेली आहे.


पठारभागातील घारगाव हे परिसरातील जवळपास सर्वच गावांचे आणि वाडी-वस्त्यांचे व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे सतत येथे नागरिकांची वर्दळ पहायला मिळते. परंतु दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी एकत्र येत स्थानिक पातळीवर दर सोमवारी संपूर्ण बाजारपेठ निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भाजीपालासह सर्वच व्यापार बंद ठेवण्यात येत आहेत. निर्णयानंतरच्या दुसर्‍या सोमवारी व्यावसायिकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. एरव्ही, किराणा, भाजीपाला, कपडे, चप्पल, चिकन-मासे, शेती औजारे अथवा इतर खरेदीसाठी सतत नागरिकांची वर्दळ असते. परंतु, नागरिकांनीही कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेेतला असल्याचेच यातून अधोरेखित होत आहे.


याचबरोबर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव असल्याने अनेक प्रवासी अथवा मालवाहू वाहने चहा, नाश्ता व जेवणासाठी येथे थांबा घेतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दर सोमवारी बंद ठेवल्यास प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यावसायिक व्यक्त करत आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. त्यात दिवसेंदिवस वाढही होत आहे. यामुळे दर सोमवारी घारगावची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कोरोनाचा लढा यशस्वी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुया.

 

Visits: 86 Today: 1 Total: 1107665

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *