कोपरगाव तालुक्यातील वीज समस्या तातडीने मार्गी लावा ः तनपुरे कृषीपंपांना दहा तास वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही ग्वाही

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील 132 के. व्ही. उपकेंद्राला तातडीने जोडण्याची ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा, अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकार्यांना ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी दिल्या आहेत.

उपकेंद्राच्या मागणीनुसार त्यांनी सहा उपकेंद्र देणार असल्याचे सांगितले. वीज रोहित्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याने, विजेच्या बहुतांश समस्या सुटणार आहेत, असे आमदार आशुतोष काळे म्हणाले. 132 के. व्ही. उपकेंद्रावरून कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी या उपकेंद्रांना जोडण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली. अद्याप कामाला सुरवात झाली नाही. धामोरी व चांदेकसारे येथील उपकेंद्र ए. सी. एफ. योजनेंतर्गत बसविणे. अतिरिक्त भाराच्या रोहित्र प्रस्तावास मंजुरी मिळावी. वारी आणि रवंदे उपकेंद्रांची क्षमता वाढवावी.

वीजबिल भरलेल्या शेतकर्यांना तातडीने रोहित्र मिळावे. नादुरुस्त रोहित्र वेळेवर मिळावे. शहरात अडचणीच्या वीजवाहिन्या स्थलांतरित कराव्यात, अशा मागण्या केल्या. कोकमठाण, शिंगवे आणि खिर्डी गणेश या उपकेंद्राला 5 एम. व्ही. ए.चे पॉवर रोहित्र बसविणार, गरज ओळखून अतिरिक्त उपकेंद्र उभारा. कोळशाच्या टंचाईमुळे कृषीपंपांचा वीज पुरवठा 10 तासांवरून आठ तास करण्यात आला होता त्याबाबत माहिती घेऊन, पुन्हा कृषीपंपांसाठी 10 तास वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता भूषण आचारी, डी. डी. पाटील, भगवंत खराटे आदी उपस्थित होते.
