मंदिरांसाठी यापुढची लढाई न्यायालयातच करावी लागेल ः विखे कोल्हार भगवतीपूरमध्ये भाजपचे मंदिरं सुरू करण्यासाठी आंदोलन

नायक वृत्तसेवा, राहाता
मुख्यमंत्री स्वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार असा सवाल भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकार आम्हांला रस्त्यावर येण्यास भाग पाडणार असेल तर, कोणतीही लढाई करण्याची आमची तयारी आहे. मंदिरांसाठी आता यापुढची लढाई आम्हांला न्यायालयातच करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने राज्यातील मंदिरं सुरु करावीत म्हणून आंदोलनं करण्यात आली. अध्यात्मिक आघाडीच्यावतीने श्री क्षेत्र कोल्हार येथील भगवती माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात आमदार विखे पाटील सहभागी झाले. शासनाच्या नाकर्तेपणावर त्यांनी सडकून टीका करताना भाविक, वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तिंच्या भावनांशी तुम्ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर बंधन घालून तुम्ही वारकर्‍यांचा अपमान केलेलाच आहे आता अधिक अंत पाहू नका. अन्यथा या भावनांचा उद्रेक होईल अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

या आंदोलनात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ.भास्कर खर्डे, सभापती नंदा तांबे, पंचायत समिती सदस्य बबलू म्हस्के, अशोक आसावा, उपसरपंच सविता खर्डे, संचालक स्वप्नील निबे, नवनाथ महाराज म्हस्के, भारत महाराज धावणे, संभाजी देवकर, उदय खर्डे, भाऊसाहेब घोलप, शिवाजी घोलप, अण्णासाहेब बेंद्रे, विजय तांबे, ऋषीकेश खर्डे, धनंजय दळे, सर्जेराव खर्डे, बब्बा शेख, तबाजी लोखंडे, अमोल थेटे, दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे आदिंसह अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिरं सुरु करण्याचे मागणीचे निवेदन आमदार विखे पाटील यांनी तहसीलदारांना सादर केले.

राज्यात एकीकडे दारूची दुकानं सरकारने सुरु केली. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तिंना तुम्ही मॉलमध्ये परवानगी दिली, मुंबई मधील लोकलही सुरु केल्या मग मंदिरांबाबतच येवढी उदासिनता का? असा सवाल उपस्थित करुन, आमदार विखे पाटील म्हणाले की, या सरकारच्या विरोधात सर्वच समाजघटकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे. अध्यात्मिक क्षेत्रही आता बाजूला राहिलेली नाहीत. मंदिरांची दारं उघडावीत म्हणून दीड वर्षापासून सर्वांची मागणी आहे पण या बहिर्‍या, मुक्या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही भावना राहिलेल्या नाहीत अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

अधिवेशन आलं की, राज्यातील कोविड वाढतो, सण, उत्सव आले की या सरकारला लॉकडाऊनची आठवन होते. शाळा सुरु करण्यासाठीही सरकार तारीख पे तारीख जाहीर करते. हे सरकार संपूर्णपणे गोंधळलेले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय शेवटपर्यंत टिकत नाहीत, मंदिरं बंद ठेवली मग मंत्र्यांचे दौरे थांबलेत का? मुख्यमंत्री स्वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मंदिर परिसरातील व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आणि भाविकांच्या श्रध्देचा सन्मान करण्यासाठी मंदिरं सुरु करण्याचा निर्णय तातडीने घ्या. अन्यथा सरकारच्या विरोधात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवटी आमदार विखे पाटील यांनी दिला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळींनी ‘उध्दवा अजब तुझे सरकार’ हे गाणे सादर करुन, वारकरी, व्यावसायिक यांच्यापुढे निर्माण झालेल्या व्यथा भजनाच्या माध्यमातून मांडल्या. सर्वच कार्यकर्त्यांनी या भजनावर ठेका धरून या आंदोलनातील उत्साह व्दिगुणीत केला.

Visits: 5 Today: 3 Total: 29273

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *