अवघ्या दहा तासांत झाली परप्रांतियाच्या खुनाची उकल! आर्थिक कारणांतून झाला खून; मिस्टर बाँडने केली चौथ्या खुनाची उकल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी पहाटे चंदनापुरी शिवारातील जावळेवस्ती परिसरात झालेल्या खुनाची उकल करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी कसून तपास करीत अवघ्या दहा तासांतच आरोपीला जेरबंद केले आहे. खून झालेला आणि तो करणारा दोघेही परप्रांतीय असून भागिदारीत सुरु केलेल्या व्यवसायात झालेल्या एकतर्फी नुकसानीतून वादावादी होवून त्यातून सदरचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संगमनेरात राहणार्‍या नवशाद अब्दुल अन्सारी याला गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास अटक केली आहे.


तालुक्यातील चंदनापुरी शिवारात जावळेवस्ती नजीकच्या चौधरी ढाब्याच्या समोरील बाजूस असलेल्या पंक्चर दुकानात सदरची घटना घडली होती. मुळचा बिहारमधील रहिवासी असलेल्या अब्दुल मोहम्मद युनुस कादीर (वय 27) याचे या ठिकाणी वाहनाच्या पंक्चरचे दुकान होते. त्यातून त्याने बर्‍यापैकी पैशांची बचत केली होती. सदरचे पैसे एखाद्या व्यवसायात लावून त्यातून समृद्धी मिळविण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी त्याने आपल्या परिचयातील नवशाद अब्दुल अन्सारी (वय 45, मुळ रा.उत्तर प्रदेश, हल्ली रहेमतनगर) याच्यासोबत भागिदारीत बेकरी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायात अब्दुल कादीर याने सुमारे पाच लाखांची रक्कम गुंतविली होती.


बेकरी व्यवसाय सुरु झाल्यानंतर त्यात सातत्याने तोटा होत गेला, त्यामुळे दोन्ही भागिदारांमध्ये अविश्‍वासाचे वातावरण तयार होवून अधुनमधून त्यांच्यात वादावादीही सुरु होती. आपण गुंतवलेले पैसे आपल्याला परत मिळावेत यासाठी अब्दुल कादीर हा नवशादकडे सतत पैशांसाठी तगादा करीत होता. त्यातूनच पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी अब्दुल कादीरचे वडील मोहम्मद युनुस यांनी मध्यस्थी करीत त्यांच्यातील वाद मिटवला व एकमेकांविषयी भरवसा कायम रहावा यासाठी देणे असलेल्या रकमेबाबत नवशादकडून प्रतिज्ञापत्र तयार घेतले, मात्र त्यातून फारसे काही साध्य होणार नाही अशी अब्दुलला खात्री असल्याने तो या समझोत्यावर फारसा खुष नव्हता.


प्रतिज्ञापत्र तयार केले गेल्याने आज ना उद्या आपल्याला अब्दुल कादीरचे पैसे द्यावेच लागणार आहेत असा एकसारखा विचार नवशादच्या मनात घोळत होता, तर नवशाद आपले पैसे सहजासहजी देणार नाही असा भरवसा अब्दुलला वाटत होता. त्यामुळे प्रतिज्ञापत्र केले गेले तरीही त्यांच्यातील अंतर्गत कटुता मात्र कायम होती. त्यातूनच त्या उपरांतही त्यांच्यात पैशांवरुन शाब्दीक हमरीतुमरी सुरुच होती. यासर्व घडमोडींनी नवशाद अस्वस्थ झाला होता. आज नाहीतर उद्या आपल्याला अब्दुलचे पैसे द्यावेच लागणार आहेत असेही त्याला सारखे वाटत, त्यामुळे तो अधिक बेचैन झाला होता.


त्यातूनच अब्दुलचा कायमस्वरुपी काटा काढण्याची योजना त्याच्या मनात घोळू लागली. यासाठी अखेर नवशादच्या मनाची तयारी होताच गुरुवारी (ता.4) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास नवशाद रहेमतनगरमधून थेट जावळे वस्तीनजीकच्या अब्दुल कादीरच्या पंक्चर दुकानावर पोहोचला. यावेळी तेथे जातांना त्याने धारदार सुराही सोबत घेतला होता. तेथे पोहोचल्यावर सुरुवातीला दोघांमध्ये काही स्वैर विषयांवर चर्चा झाल्यानंतर अब्दुल आपल्या पैशांच्या मागणीवर आला आणि त्यातून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली. एकतर थंडीचा अंमल आणि त्यात मध्यरात्र उलटून गेल्याने या दोघात वाद सुरु असला तरीही तो सोडवण्यासाठी आसपास कोणीही नव्हते.


याचाच फायदा घेत आज हा विषय संपवायचाच असा निर्धार करुन तेथे गेलेल्या नवशादने सोबत नेलेल्या सुर्‍याने अब्दुलला पाठीमागून भोसकून त्याचा खून केला, तो जिवंत राहु नये यासाठी आरोपीने त्याच्या दुकानातील लोखंडी टामीनेही त्याच्या डोक्यात प्रहार केले. त्यामुळे अब्दुल जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सदरचा प्रकार कोणाच्या लक्षात येवू नये यासाठी नवशादने मयत अब्दुलच्या अंगावर त्याच्याच दुकानात असलेली चादर पांघरली व तो तेथून सहज निघून गेला आणि घरी जावून आरामात झोपला.


गुरुवारी सकाळी 11 वाजून गेले तरीही अब्दुलभाईची लगबग दिसत नसल्याने त्याच्या दुकानजवळच राहणार्‍या विकास तात्याभाऊ रहाणे यांना संशय आल्याने त्यांनी पंक्चरच्या दुकानाजवळ जात त्याला हाका मारल्या, मात्र कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दुकानात डोकावून पाहीले असता अब्दुल पांघरूणात असल्याचे त्यांना दिसले, मात्र त्याचवेळी दुकानाच्या पत्र्यावर रक्ताचे डागही दिसल्याने ते घाबरले व त्यांनी तेथूनच चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस पाटलांनीही घटनास्थळी धाव घेवून तपासणी केली असता अब्दुल कादीर मृतावस्थेत असल्याची त्यांना खात्री पटल्याने त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार यांना कळविले.


काही वेळातच संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पो.नि.पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. याबाबत वरीष्ठांनाही माहिती देण्यात आली. दुपारी श्रीरामपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर व अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटकेही संगमनेरात पोहोचले. तत्पूर्वी गुरुवारी पहाटे घारगाव शिवारात एटीएम फोडीचाही प्रकार घडल्याने अहमदनगरचे श्‍वान पथक व नाशिकचे ठसे तज्ज्ञांचे पथकही संगमनेरात आलेले होते. त्यामुळे या खुनाचा शोध घेण्यासाठी त्यांनाही पाचारण करण्यात आले होते, मात्र तपासात त्यांच्याकडून मदत मिळण्यापूर्वीच संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या विचारांचे चक्र अधिक गतिमान झाले.


त्यांनी पुराव्यांची जुळवाजुळव करतांना मयत अब्दुल कादीरच्या पंक्चर दुकानाची कसून तपासणी केली. त्यातून पंधरा दिवसांपूर्वी मयताच्या वडिलांच्या मध्यस्थीने संगमनेरातील रहेमतनगरमध्ये राहणार्‍या नवशाद अब्दुल अन्सारी याच्यासोबत करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र त्यांच्या हाती लागले आणि तपासाचे अर्धेकाम फत्ते झाले. मयताची ओळख पटविल्यानंतर त्याच्या कुटुंबाचीही ओळख समोर आली आणि त्यातून या संपूर्ण प्रकरणाची एक एक कडी जोडीत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने नवशाद अब्दुल अन्सारीपर्यंत जावून पोहोचले आणि खुनाची घटना घडल्यापासून अवघ्या दहा तासांतच रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी रहेमतनगरमध्ये छापा घालीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


त्याला ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने भागिदारीच्या व्यवसायातून सुरु झालेले वाद कायमचे संपविण्यासाठी आपण अब्दुल मोहम्मद युनुस कादीर (वय 27) याचा खून केल्याची कबुली दिली. त्यावरुन तालुका पोलिसांनी त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून आज त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा निम्म्याहून अधिक तपास पूर्ण झाला असून खुनाचा सुत्रधार गजाआड गेला आहे. मात्र पोलिसांना अजूनही पुराव्यांची आवश्यकता असल्याने व या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग असण्याचीही शक्यता असल्याने पोलिसांकडून आरोपीची कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा तालुका पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी दिली. तालुका पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा जलद तपास करुन अवघ्या दहा तासांतच खुनाची उकल केल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तालुका पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

‘मिस्टर बाँड’ने केली चौथ्या खुनाची उकल..
पोलीस उपअधीक्षक राहुल मदने संगमनेरच्या पोलीस दलात ‘मिस्टर बाँड’ समजले जातात. त्यांच्या कारकीर्दीत संगमनेर तालुक्याच्या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दित घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. गेल्या वर्षी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील निळवंडे येथील दरोड्यातून झालेला वृद्धेचा खून, ऐन दिवाळीच्या दिवशी घुलेवाडीतील हॉटेल विकासच्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करीत तिचा केलेला निर्घुन खून, दोन महिन्यांपूर्वी घुलेवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला सापडलेल्या अनोळखी इसमाचा खून आणि गुरुवारी चंदनापुरी शिवारात झालेला पंक्चर दुकानचालकाचा खून या चारही प्रकरणांची उकल त्यांनी केली आहे. यातील गुरुवारचा प्रकार वगळता उर्वरीत तिनही खुनांच्या घटनांमध्ये पोलिसांच्या हाती काहीच नव्हते, तरीही उपअधीक्षक मदने यांनी त्या प्रकरणांचा अतिशय जिद्दीने तपास करुन आरोपींना गजाआड करण्याची किमया साधली आहे. म्हणूनच त्यांना संगमनेरच्या पोलीस दलात ‘मिस्टर बाँड म्हणून ओळखले जावू लागले आहे.’

Visits: 13 Today: 1 Total: 118972

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *