संगमनेरात आदिवासी बांधवांचा विविध मागण्यांसाठी एल्गार मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सरकारी कार्यालये बंद करु ः ढवळे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आदिवासी बांधवांना जिवंतपणे जागा नाही, परंतु मरण आल्यावरही पुरण्यासाठी जागा नाही. आदिवासींच्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढून ही जागा आदिवासींच्या ताब्यात द्यावी. जर आदिवासींच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकारी कार्यालय चालू देणार नाही, असा इशारा एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा नाशिक म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी शासनाला दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून गुरुवारी (ता.3) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पुढे बोलताना ढवळे म्हणाले, आदिवासी समाजाच्या किरकोळ मागण्यांसाठी प्रशासन आदिवासी बांधवांना वेठीस धरत आहे. तालुक्यातील मंगळापूर येथील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल केले जातील. माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी पदाचा विचार करणार नाही आम्ही सनदशीर मार्गाने मोर्चा काढला. मात्र जर आदिवासींच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकारी कार्यालय चालू देणार नाही असा इशारा ढवळे यांनी दिला.

अधिकार्यांच्या कामात अडथळा आणला तर 353 दाखल केला जातो. मात्र आदिवासीला जबर मारहाण केली तर साधी एनसी दाखल केली जाते हा पोलीस खात्याचा प्रताप आहे. संविधानाच्या विरोधात काम करणार्यांना तुम्ही संरक्षण देतात आणि गोरगरीब असणार्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यास तुमच्या हाताला लकवा होतो आणि राजकीय नेत्यांची कामे करण्यासाठी पळत सुटतात अशी टीका ढवळे यांनी केली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्याचे नेते अशोक थोरात, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव विजय बर्डे, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिले.

नायब तहसीलदारांना सुनावले खडे बोल..
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदारांना निवेदन देत चांगलेच सुनावले. मोर्चाला राज्यमंत्री आले असता अधिकार्यांना तुम्ही का बोलवले नाही? असा सवाल ढवळे यांनी विचारला. आम्ही मोर्चा घेऊन आल्यानंतर तुम्ही मागण्यांचा विचार करता मात्र यापूर्वी का केला नाही? या मागण्या कधी पूर्ण करणार ते आम्हाला लेखी द्या. मंगळापूर प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली हे पोलिसांना विचारा असे ढवळे सुनावले.
