चंदनापुरीचे सिंधू लॉन्स ठरतेय कोविड रुग्णांसाठी नवसंजीवनी प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेल्या सेंटरला होतेय समाजातून मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या दुसर्या लाटेने अक्षरशः सर्वत्र हाहाकार उडवून दिला होता. रोज बाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडत असल्याने समाजातील अनेक दानूशर मदतीसाठी पुढे सरसावले. यामध्ये ज्ञानदान करणारे गुरुजीही मागे राहिले नाहीत. संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या पुढाकारातून चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये विविध सुविधांयुक्त कोविड केअर सेंटरची निर्मिती केली. याचा अनेक गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांना फायदा झाल्याने यशस्वी उपचारांती ठणठणीत बरे होवून रुग्ण घरी परतले. यामुळे गेल्या एक महिन्यांपासून हे कोविड सेंटर बाधित रुग्णांसाठी नवसंजीवनीच ठरत आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे व गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांच्या संकल्पनेतून संगमनेरमधील प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड सेंटर सुरू करण्यास पुढाकार घेतला. त्यानुसार 27 एप्रिलला आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत 376 रुग्ण यशस्वी उपचारांती बरे होवून घरी परतले आहेत. विशेष म्हणजे रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण या सेंटरमध्ये असल्याची ख्याती देखील मिळवली आहे. चोवीस तास वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी, उच्च गुणवत्तेची औषधे, योगासने, वाचनालय, मनोरंजक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, समुपदेशन, चौरस नाष्टा, अंडे, आयुर्वेदिक काढा व संतुलित जेवण आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. याकामी शिक्षकांबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत होत आहे.

तसेच प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप हे सर्वतोपरी सहाय्य करत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी के. के. पवार, समन्वयक आर. पी. रहाणे हे दैनंदिन कामकाजाचे संयोजन करत आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी माधव हासे, गौतम मिसाळ, पोपट काळे, मोहन लांडगे, चंदू कर्पे, शिवाजी आव्हाड, संतोष दळे, गवनाथ बोर्हाडे, नंदू रहाणे, राजू कडलग, बाळासाहेब गुंजाळ, सचिन अंकाराम, रवींद्र अनाप, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भागवत, सोमनाथ गळंगे, सुनील देशमुख, संतोष भोर, सत्यवान गडगे, संदीप पर्बत, अशोक शेटे, अण्णा शिंदे, कैलास वाघमारे, केशव घुगे, निवृत्ती भागवत, प्रकाश शिंदे, विलास दिघे, प्रभाकर काळे, प्रदीप अनाप, अशोक शेटे, दीपाली रेपाळ, अनिता गुंजाळ, वृषाली कडलग, मीना साबळे, भाऊ रंधे, सोमनाथ मदने आदिंचे सहकार्य लाभत आहे.

विशेष म्हणजे सिंधू लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक नरेंद्र रहाणे यांनी मोफत कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजीत थोरात, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना बालोडे, सभापती सुनंदा जोर्वेकर, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, स्ट्रॉबेरीच्या संचालिका संज्योत वैद्य यांनी सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.
![]()
संगमनेरातील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सतीश वर्पे यांनी कोविड सेंटरला 31 हजार रुपयांची देणगी देऊन मदतीचा हात दिला आहे. तर शिक्षक कैलास डांगे व वैद्यकीय अधिकारी डॉ.बबन फटांगरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त येथील सर्व रुग्णांना प्रत्येकी एकवेळचे मिष्टन्न भोजन उपलब्ध करून दिले.
